तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये पुन्हा चर्चा

नवी दिल्ली -सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये गुरूवारी पुन्हा चर्चा झाली. राजनैतिक पातळीवरील चर्चेत प्रलंबित मुद्द्यांवर वेगाने तोडगा काढण्याविषयी सहमती झाली. त्याशिवाय, प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगतच्या पूर्ण सैन्यमाघारीसाठी प्रामाणिक पाऊले उचलण्याची तयारी चीनने पुन्हा दर्शवली.
चीनी कुरापतींमुळे एलएसीलगत असणाऱ्या पूर्व लडाख भागात काही दिवसांपूर्वी मोठा तणाव निर्माण झाला. भारताने आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने नरमलेल्या चीनने त्या भागातील काही ठिकाणांवरून सैन्य मागे घेतले.
मात्र, चीनने पूर्ण सैन्यमाघार घेतली नसल्याने तणाव पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. त्यातून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक तसेच लष्करी पातळ्यांवर चर्चेचे सत्र सुरू आहे.
दोन्ही देशांत चर्चेची आणखी एक फेरी झाली. त्या व्हर्च्युअल चर्चेत एलएसीलगतच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. द्विपक्षीय संबंध वाढीस लागण्यासाठी सीमा भागांत शांतता आवश्यक असल्याच्या बाबीवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. आता यावेळी दिलेला शब्द तरी चीन पाळणार का याविषयी उत्सुकता आहे.





