IndiGo : ‘या’ कारणामुळे 70 हून अधिक इंडिगो विमानांच्या फेऱ्या रद्द; मुंबई विमानतळावर प्रवाशांना त्रास

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला सध्या मोठ्या परिचालन संकटाचा सामना करावा लागत आहे. आज बुधवार, ३ डिसेंबर रोजी इंडिगोने ७० हून अधिक विमानसेवा रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा रद्द होणे आणि विलंबाने उड्डाणे होणे यामुळे हवाई प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. बुधवारी इंडिगोने ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द केले, ज्यात बेंगळुरू आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांतील सेवांचा समावेश आहे.
क्रूच्या कमतरतेमुळे संकट –
वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोला वैमानिक आणि केबिन क्रूची मोठी कमतरता जाणवत आहे. कंपनीने अनेक उड्डाणे रद्द करावी लागल्याचे आणि काही विमानांना विलंब होत असल्याचे मान्य केले आहे. मुख्यत्वे क्रू मेंबर्सच्या तुटवड्यामुळे हे विमानसेवेचे नियोजन कोलमडले आहे.
इंडिगोचे स्पष्टीकरण –
या परिस्थितीवर इंडिगोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांत, तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या, विमानतळांवर झालेली गर्दी आणि परिचालनासंबंधीच्या इतर गरजांसह अनेक कारणांमुळे आमच्या अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे आणि काही उड्डाणे रद्द झाली आहेत.”
नवीन FDTL नियमांमुळे वाढले आव्हान –
एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिट (FDTL)’ नियमांचा दुसरा टप्पा लागू झाल्यापासून इंडिगोला क्रू मेंबर्सच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे विमानतळांवरील उड्डाणे रद्द करावी लागली असून काही उड्डाणे खूप विलंबाने होत आहेत. मंगळवारी बिघडलेली परिस्थिती बुधवारी अधिक गंभीर झाली.
FDTL नियमांनुसार बदल:
-साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवून ४८ तास करणे.
-रात्रकालीन कामाच्या वेळेचा विस्तार करणे.
-रात्रीच्या लँडिंगची संख्या पूर्वीच्या सहावरून फक्त दोनपर्यंत मर्यादित करणे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डीजीसीएने (DGCA) हे नवीन नियम लागू केले. सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया आणि इतर देशांतर्गत विमान कंपन्यांनी या नियमांना विरोध केला होता.
‘ऑन-टाईम परफॉर्मन्स’मध्ये मोठी घट –
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सहा प्रमुख देशांतर्गत विमानतळांवर इंडिगोचा ‘ऑन-टाईम परफॉर्मन्स’ (वेळेवर उड्डाण करण्याची कामगिरी) घसरून केवळ ३५% इतका झाला आहे. या तुलनेत, एअर इंडिया (६७.२%), एअर इंडिया एक्सप्रेस (७९.५%), स्पाइसजेट (८२.५०%) आणि अकासा एअर (७३.२०%) या कंपन्या वेळेवर उड्डाण करण्यात यशस्वी ठरल्या.





