जी 20 च्या अध्यक्षीय काळात भारताची चांगली कामगिरी – व्हिटिंगडेल

पणजी/नवी दिल्ली – सध्या जी 20 संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे असून या अध्यक्षपदाच्या काळात भारताने चांगली कामगिरी केली आहे असे ब्रिटनचे एक मंत्री सर जॉन व्हिटिंगडेल यांनी म्हटले आहे. ते सध्या जी 20 च्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आले आहेत. व्हिटिंगडेल हे ब्रिटीश सरकारमध्ये मीडिया, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग खात्याचे मंत्री आहेत. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी G20 चे अध्यक्षपद स्वीकारले. 9-10 सप्टेंबरच्या शिखर परिषदेने भारताच्या अध्यक्षपदाचा समारोप होत आहे. पण त्यानिमीत्त भारतात विविध ट्रॅक अंतर्गत सुमारे 200 बैठका देशभरात आयोजित केल्या जातील.
अध्यक्ष म्हणून आतापर्यंत भारताच्या भूमिकेबद्दल विचारले असता,त्यांनी भारताचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत एक उत्कृष्ट काम करत आहे. आम्ही येथे गोव्यात ज्या बैठका घेतल्या आहेत, त्या अप्रतिमपणे आयोजित केल्या गेल्या आहेत. आम्ही आता ब्रिटीश पंतप्रधानांच्या भारत भेटीसाठी विशेष उत्सुक आहोत असे ते म्हणाले. ते आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पणजीतील पर्यटन क्षेत्राबाबत पणजीत जी 20 च्या अनेक बैठका घेतल्या गेल्या आहेत. भारताचे पर्यटन राज्यमंत्री एस वाय नाईक यांनीही व्हिटिंगडेल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.





