Sonia Gandhi Book : मोदींमुळे भारताची लोकशाही धोक्यात.! सोनिया गांधींच्या आत्मचरित्राबाबत एका मुलाखतीत वक्तव्य
१० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह या आपल्या आत्मचरित्राच्या निमित्ताने एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी सोनिया गांधी दिलखुलासपणे बोलत होत्या.

Sonia Gandhi Book – नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत भारताची लोकशाही, विविध संस्था आणि देशाच्या सामाजिक जडणघडणीचे मोठे नुकसान केले आहे. हे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही, संपूर्ण व्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी बराच वेळ आणि प्रचंड प्रयत्नांची आवश्यकता असेल.
लोक आता हे नुकसान ओळखू लागले आहेत आणि त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. पण भारतीय नागरिक पुन्हा एकदा योग्य प्रशासनाकडे परतण्याचे स्वागत करतील, असे प्रतिपादन काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.
१० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह या आपल्या आत्मचरित्राच्या निमित्ताने एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी सोनिया गांधी दिलखुलासपणे बोलत होत्या. हार्परकॉलिन्स इंडियाद्वारे प्रकाशित हे आत्मचरित्र म्हणजे एक वैयक्तिक संस्मरण आहे. त्यामध्ये राजकारण हे पार्श्वभूमी किंवा एक प्रकारची चौकट म्हणून काम करते.
काँग्रेसच्या घसरणीबद्दल आणि पक्षाच्या सध्याच्या स्थिती व भविष्याबद्दल विचारले असता, सोनिया गांधी म्हणाल्या, मी इतकी निराशावादी नाही. हे लक्षात घ्या की, हे सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना समान संधी मिळालेली नाही. त्यांचे सर्व संस्थांवर, विशेषतः निवडणूक आयोगावर पूर्ण नियंत्रण आहे.
मुख्य प्रवाहातील माध्यमांवर त्यांची पकड आहे. त्यांच्याकडे अमाप पैसा आहे आणि ते धर्माचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत. तरीही, आमचा पक्ष संघर्ष करत आहे आणि प्रगतीही करत आहे. खरं तर, हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे या आक्रमणाचा सामना करण्याची जिद्द आहे.
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांना सर्व प्रकारच्या छळाचा सामना करावा लागला आहे. तरीही, प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात, काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांसाठी अजूनही लढा देत आहेत.
अलीकडच्या काही महिन्यांत अनेक निवडणुकांमध्ये मतदानाशी छेडछाड किंवा गैरप्रकार झाले, हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे आणि आता लोक त्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. काँग्रेस समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत काम करत आहे आणि आमची स्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या उदयापासून काँग्रेसने काय धडा घ्यावा, यावर गांधी म्हणाल्या, हे खरे आहे की ते एका पूर्णपणे वेगळ्या वैचारिक विश्वातून आले आहेत. परंतु, काँग्रेस पक्षातही लोक अनेक मार्गांनी यशस्वी होऊ शकतात; उदाहरणार्थ, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. मला वाटत नाही की, आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही शिकण्यासारखे आहे.
काय आहे पुस्तकात?
१. इटलीतील व्हेनेटो प्रांतात युद्धोत्तर काळात गेलेले बालपण
२. १९६५ मध्ये केंब्रिज येथे राजीव गांधींशी झालेली भेट, त्यांचा विवाह
३. संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या निधनाचे दु:खद प्रसंग
४. तंदूरी चिकनचा पहिला अनुभव, साडी नेसताना होणारी ओढाताण
५. सोनिया गांधींचा पंतप्रधानपद स्वीकारण्यातला नकार
६. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदापासून आलेल्या अडचणी






