Asian Schoolgirl Boxing C’ships : भारताची ‘दीपाली थापा’ पहिली आशियाई चॅम्पियन

Indian Boxer Deepali Thapa | first Asian champion – भारताची युवा बॉक्सर असणारी दीपाली थापाने युएईमध्ये झालेल्या आशियाई शालेय बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम लढतीत युक्रेनच्या लिउडमिला वासिलचेन्कोला पराभूत करताना विजेतेपद साकारले. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी तब्बल ७ पदकांची कमाई केली.
दीपाली थापाने ३३ किलो वजनी गटात दमदार कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या अनेल्या ओर्डाबेकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम लढतीत देखील दीपालीने उत्कृष्ट तंत्र आणि नियंत्रण याचा सुरेख मेळ साधताना, युक्रेनच्या लिउडमिला वासिलचेन्कोलावर वर्चस्व गाजविले.
३५ किलो वजनी गटात भारताच्या भूमीने पुन्हा एकादा शानदार कामगिरी बजावताना कझाकस्तानच्या एसेल जालिंबेकोवाला पराभूत करताना विजेतेपदावर मोहोर लावली. भारताच्या निश्चल शर्माने ३७ किलो वजनी गटात युक्रेनच्या मारिया मत्स्युरावर विजय मिळविताना भारताला तिसरे पदक मिळवून दिले.
४३ किलो वजनी गटात भारताच्या राखीने युक्रेनच्या वेरोनिका होलुबला पराभूत करून चौथ्या विजय मिळविला. भारताच्या लक्ष्मी मंजुनाथ लमाणीला ४० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या ओलेक्झांड्रा चेरेवाताकडून पराभूत व्हावे लागले.
लक्ष्मीने या लढतीत चांगली लढत दिली मात्र युक्रेनच्या उंच खेळाडूंने आपल्या उंचीचा फायदा घेताना विजय साकारला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत ७ विजेतेपदे मिळविली. या स्पर्धेत अफगाणिस्तान, चायनीज तैपेई आणि बांगलादेशसह 26 देशांतील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.





