व्यापार युद्धातही भारताची कमाल! परकीय चलन साठा 4 अब्ज डॉलरने वाढला, RBI चा मास्टरस्ट्रोक!

मुंबई – व्यापार युद्ध चालू असताना 5 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय गंगाजळीत चार अब्ज डॉलरची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्यात भारताकडे असलेले परकीय चलन 698.2 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे.
विशेष म्हणजे रुपयाला सावरण्यासाठी या आठवड्यात रिझर्व बँकेने डॉलरचा वापर करून बराच हस्तक्षेप करूनही या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलरने वाढ झाली होती. या आठवड्यामध्ये शेअर बाजार निर्देशांक वाढले आहेत. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात खरेदी केली आहे.
तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्जरोख्याची खरेदी बरीच केल्यामुळे भारतीय कर्जरोख्याचा परतावा वाढला आहे. या कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होण्यास मदत झाली असल्याचे समजले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आठवड्यामध्ये जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य या आठवड्यातील 3.53 अब्ज डॉलरने वाढून 90.29 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे.
यामुळे खर्या अर्थाने भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. भारताकडे असलेला परकीय चलन साठा सध्या उच्चांकी पातळीच्या जवळ गेला आहे. मात्र तरीही परकीय चलन संवर्धनासाठी रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहेत. अमेरिकेला होणारी निर्यात कमी होणार असली तरी इतर देशांना निर्यात वाढवून ही तूट भागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर डॉलरशिवाय इतर चलनाच्या माध्यमातून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.





