Mohammad Azharuddin on Handshake controversy : आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर हस्तांदोलन वादाने चांगलाच ताप घेतला आहे. भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला, पण सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे पीसीबीने एसीसीकडे आणि आयसीसीकडे तक्रार दाखल केली. यासोबतच, पीसीबीने सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनाही दोषी ठरवत त्यांना आशिया चषकातून तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. याबाबत आता माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद अझरुद्दीन काय म्हणाले? एनडीटीव्हीशी बोलताना अजहरुद्दीन म्हणाले, “माझ्या मते, हस्तांदोलन करण्यात काहीही चूक नाही. जेव्हा तुम्ही सामना खेळता, तेव्हा सामन्याशी संबंधित सर्व गोष्टी करायला हव्यात, मग ती हस्तांदोलन असो वा अन्य काही. मला खरोखर समजले नाही की यात अडचण काय होती. माझ्या मते, हस्तांदोलनात कोणतीही अडचण असायला नको होती. जर तुम्ही निषेधाच्या भावनेने खेळत असाल, तर खेळण्यापेक्षा न खेळणे बरे. निषेधाच्या वेळी खेळण्याचा काही अर्थ नाही. पण जर तुम्ही खेळण्यास तयार आहात, तर पूर्ण ताकदीने खेळायला हवे, अन्यथा खेळण्याची गरजच नाही.” हस्तांदोलन वादाची संपूर्ण कहाणी – १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला. पाकिस्तान संघाने भारतीय खेळाडूंच्या वर्तनाविरोधात तक्रार दाखल केली आणि कारवाईची मागणी केली.एवढेच नव्हे, तर पीसीबीने युएईविरुद्धच्या पुढील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली होती. हेही वाचा – IND vs PAK : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! बुमराह-वरुणचे पुनरागमन, पाहा प्लेइंग इलेव्हन पाकिस्तानी खेळाडू वेळेवर स्टेडियमवर पोहोचले नाहीत, ज्यामुळे सामना एक तास उशिराने सुरू झाला. आयसीसीशी लांबलचक चर्चेनंतर पाकिस्तान संघ सामना खेळण्यास तयार झाला, पण त्यांनी सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून हटवण्याची मागणी कायम ठेवली.या वादाने क्रिकेट विश्वात खळबळ उडवली असून, यावरून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या वक्तव्यमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.