Asian Squash Doubles Championship 2024 : भारतीय स्क्वॉशपटूअभय सिंगचा दुहेरी सुवर्ण धमाका…

Asian Squash Doubles Championship 2024 in Malaysia : भारताचा स्क्वॉशपटू अभय सिंगने चमकदार कामगिरी करत रविवारी आशियाई दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक विजेतेपद सुवर्णपदक विजेत्या अभयने वेलावन सेंथिलकुमारसह पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यानंतर अनुभवी जोश्ना चिनप्पासह या प्रतिभावान खेळाडूसह मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीतही विजय साकारत सुवर्ण कामगिरी केली.
अभय आणि वेलावन या अव्वल मानांकित जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत ओंग साई हंग आणि सियाफिक कमल या मलेशियाच्या द्वितीय मानांकित जोडीचा 11-4, 11-5 असा पराभव केला तर यानंतर अभय आणि जोश्ना या तिसऱ्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत टोंग सेज विंग आणि टांग मिंग होंग या द्वितीय मानांकित जोडीचा 11-8, 10-11, 11-5 असा पराभव केला.
विजयानंतर वेलावन म्हणाला की, अभयने या आठवड्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता आणि आम्ही चांगली कामगिरी करत राहिलो. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या पाच महिन्यांपासून मी खेळापासून दूर असल्यामुळे भारतासाठी पुन्हा खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. दुहेरीतून पुनरागमन करण्याची ही चांगली संधी होती जेणेकरून मी पीएसए टूरवर पुनरागमन करू शकेन.





