Rajnath Singh : आसियानच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला राजनाथ सिंह जाणार

नवी दिल्ली : मलेशियात कुआला लंपूर येथे १ नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या १२ व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. एडीएमएम-प्लसच्या १५ वर्षांच्या कामगिरीबद्दल विचारमंथन आणि आगामी वाटचालीची आखणी या विषयावर ते व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करतील. सदर कार्यक्रमाच्या जोडीला, मलेशियाच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या आसियान-भारत संरक्षण मंत्रीस्तरीय अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व आसियान सदस्य देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत.
आसियान सदस्य देश आणि भारत यांच्या दरम्यान संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य आणखी मजबूत करणे आणि अॅक्ट इस्ट धोरणाला पुढे नेणे हा या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश आहे. एडीएमएम ही अग्नेय आशियाई देशांच्या संघटनेतील संरक्षण सल्ला आणि सहकार संदर्भातील सर्वोच्च यंत्रणा आहे. एडीएमएम-प्लस हा आसियान सदस्य असलेल्या ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया,म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, तिमोर लेस्ते आणि व्हिएतनाम या सदस्य देशांसह भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या आठ संवादी भागीदार देशांतील सुरक्षा आणि संरक्षण संबंधित सहकार्य बळकट करण्यासाठी निर्मित मंच आहे.
भारत १९९२ मध्ये आसियान संघटनेचा संवादी भागीदार झाला आणि १२ ऑक्टोबर, २०१० रोजी व्हिएतनाममध्ये हनोई येथे एडीएमएम-प्लसचा उद्घाटनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वर्ष २०१७ पासून आसियान सदस्य देश आणि प्लस देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्याला अधिक चालना देण्यासाठी दर वर्षी एडीएमएम-प्लस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.





