ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या युवतीला शौर्य पुरस्कार; चाकू हल्ल्यापासून वाचवलं होतं मैत्रिणीला

लंडन : दोन वर्षांपुर्वी नॉटिंगहॅममध्ये झालेल्या चाकू हल्ल्यापासून आपल्या मैत्रिणीला वाचवताना वीरमरण आलेल्या भारतीय वंशाच्या युवतीला ब्रिटनमध्ये मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ग्रेस ओमेली – कुमार असे पुरस्कार दिला गेलेल्या भारतीय वंशाच्या युवतीचे नाव आहे. सोमवारी अतुलनीय धाडसाबद्दल ब्रिटनमधील जॉर्ज मेडल या सर्वोच्च नागरी सन्मानाने तिचा गौरव करण्यात येणार आहे. तीन श्रेणींमध्ये एकूण २० व्यक्तींना उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
दिनांक १३ जून २०२३ रोजी १९ वर्षांच्या ग्रेस आणि तिची वर्गमैत्रिण बार्नाबी वेबर या दोघी नॉटिंगहॅम विद्यापिठातून परत येत असताना वोल्दो कॅलोकेन या माथेफिरुशी त्यांचा सामना झाला. कॅलोकेन याने पहिल्यांदा वेबर हिच्यावर हल्ला केला. ग्रेस हिने आपल्या मैत्रिणीला वाचवायचा प्रयत्न केला. तेंव्हा कॅलोकेन याने ग्रेसवरही हल्ला केला होता. कॅलोकेन याने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये या दोघींचा मृत्यू झाला होता. कॅलोकेन याला नंतर उच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये मानसिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले होते. ग्रेस आणि बार्नाबी या दोघीही वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत होत्या.
ग्रेस हिचे पालक डॉ. संजोय कुमार आणि आई डॉ. सिनेएद ओ मालेली यांच्या प्रमाणे तिलाही डॉक्टर व्हायचे होते. ती हॉकी खेळत असायची आणि इंग्लंडच्या किशोरवयीन मुलींच्या हॉकी संघाकडून ती हॉकी खेळली होती. तिला क्रिकेट खेळण्याचीही आवड होती. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ग्रेस ओलेली कुमार हिच्या धाडसी योगदानाबद्दल आणि तिच्या हौतात्म्याबद्दल तिला आदरांजली वाहिली आहे.
ग्रेस हिला मरणोत्तर जाहीर झालेला शौर्य पुरस्कार ग्रेस हिच्या कुटुंबियांकडे सोपवला जाणार आहे. ग्रेस हिच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ ओमेली कुमार फौंडेशन स्थापन केले असून क्रीडा, मानसिक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातल व्यक्ती आणि संस्थांना मदत आणि प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करणार आहे.




