Ranjangaon Crime – बाभुळसर खुर्द येथील दोन व्यक्तींचे सुरू असलेले भांडण शांत करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या १८ वर्षीय निष्पाप तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात विश्वजीत फंड हा तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हाताच्या नसा तुटल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निखिल गुंजाळ आणि सोनू वाळके यांचे रांजणगाव येथील गौरव फंड यांच्याशी कहीतरी कारणावरून जोरदार भांडण सुरू होते. हे भांडण पाहून विश्वजीत फंड हा तरूण तिथे गेला आणि त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तू भांडण सोडवायला का आलास? याचा राग मनात धरून आरोपी सोनू वाळके व निखिल गुंजाळ यांनी विश्वजीतला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.रागाच्या भरात आरोपींनी विश्वजीतवर चाकूने हल्ला केला. हा वार त्याने हातावर झेलल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या तळहाताला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात त्याच्या अंगठ्याचे हाड मोडले असून दोन महत्त्वाच्या नसा तुटल्या आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विश्वजीत फंड याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस कर्मचारी अजित पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.