Piyush Chawla Retirement : विराट-रोहितनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; दोन विश्वचषक विजेत्याचा भावनिक निरोप!

Piyush Chawla Announces Retirement from All Cricket Formats : भारतीय लेग-स्पिनर पीयुष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पीयुष चावलाने ६ जून (शुक्रवार) सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात चावला भारतीय संघाचा भाग होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ते दोन्ही विश्वचषक जिंकले. चावलाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निवृती जाहीर केली.
पियुष चावलाने शेअर केली भावनिक पोस्ट –
३६ वर्षीय पियुष चावलाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘मी कृतज्ञतेने हा अध्याय संपवत आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. या सुंदर प्रवासात मला नेहमीच साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार. दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर घालवल्यानंतर, आता या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होण्यापर्यंत, या अद्भुत प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आशीर्वाद ठरला आहे.’
या सर्व आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील –
View this post on Instagram
चावलाने पुढे लिहिले, ‘या सर्व आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील. तसेच माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व आयपीएल फ्रँचायझींचे मी मनापासून आभार मानतो. पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स. इंडियन प्रीमियर लीग माझ्या कारकिर्दीतील एक अतिशय खास अध्याय आहे आणि त्यात खेळण्याच्या प्रत्येक क्षणाचे मी कौतुक केले आहे. मी विशेषतः माझे प्रशिक्षक के.के. गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचे आभार मानतो, ज्यांनी मला क्रिकेटपटू म्हणून घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.’
पियुष चावलाची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द –
पियुष चावला शेवटचा डिसेंबर २०१२ मध्ये भारताकडून खेळताना दिसला होता. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज पियुषने भारतासाठी तीन कसोटी, २५ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळले. त्याने कसोटीत सात, एकदिवसीय सामन्यात ३२ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४ विकेट्स घेतले आहेत. पियुष चावलाने आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २६.६० च्या सरासरीने १९२ विकेट्स घेतल्या आहेत.





