Vinod Kambli : आर्थिक संकटात सापडलेल्या विनोद कांबळींना मिळाली नोकरी!

मुंबई – क्रिकेटचे मैदान गाजवणारे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ही माहिती दिली होती. यावेळी त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसांत अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी कांबळी यांना नोकरीची ऑफर दिली. ती ऑफर विनोद कांबळी यांनी स्वीकारली आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना दरमहा एक लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी नुकतीच स्वीकारली आहे. सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेले वक्तव्य उद्योजक संदीप थोरात यांच्या पाहण्यात आले. देशासाठी खेळलेल्या खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवल्याने आपण त्यांना ही ऑफर दिल्याचे संदीप थोरात यांनी सांगितले.
सोबतच क्रिकेट हा मॅनेजमेंटचा खेळ आहे आणि एखाद्या फायनान्स कंपनीत ही मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कांबळी यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आमच्या कंपनीला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी मुंबईत जाऊन कांबळी यांची भेट घेत ऑफर दिली. विनोद कांबळी यांनीही ही ऑफर स्वीकारली.





