भारतीय वाहन उद्योग पुढील पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल: नितीन गडकरी

नवी दिल्ली – परंपरागत इंधनाबरोबरच नव्या इंधनावर भारतात वाहनांची निर्मिती वाढत आहे. भारतातील वाहन उद्योगाचा वेग एवढा आहे की पुढील पाच वर्षात भारतीय वाहन उद्योग जगातील क्रमांक एकचा वाहन उद्योग होईल, याबद्दल आपल्याला खात्री वाटत आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
अॅमेझॉन संभव शिखर परिषदेत बोलताना गडकरी यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा या मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतला होता, त्यावेळी भारतीय वाहन उद्योग केवळ सात लाख कोटी रुपयाचा होता. तो आता 22 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. सध्या क्रमांक एकवरील अमेरिकेतील वाहन उद्योग 78 लाख कोटी रुपयांचा आहे.
दुसर्या क्रमांकावरील चीनचा उद्योग 47 लाख कोटी रुपयांचा आहे. तर भारत तिसर्या क्रमांकावर आहे. पुढील पाच वर्षात भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा उद्योग करण्याबाबत आम्ही अनेक पातळ्यावर प्रयत्न करत आहोत, यात आम्ही यशस्वी होऊ असे त्यांनी सांगितले.
जगातील सर्वच वाहन कंपन्या भारतात येऊन उत्पादन करू इच्छित आहेत. कारण भारतामध्ये त्यांच्यासाठी पूरक वातावरण आहे. योग्य मनुष्यबळ उपलब्ध आहे. भारतातील वाहन उद्योग विस्तारत आहे. भारतातील कंपन्या जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशी वाहने निर्माण करून ती निर्यात करीत आहेत. त्यामुळे आगामी पाच वर्षात भारतीय वाहन उद्योगाचा विस्तार मोठ्या गतीने होणार आहे.
भारत पर्यायी इंधन विकसित करण्याबाबत प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत आहे. त्यामुळे भारताचा खनिज तेल आयातीचा खर्च वेगाने कमी होण्यास मदत होत आहे. ऊर्जा सुरक्षिततेला भारताचे प्राधान्य आहे. तसे केले तरच भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय वस्तूचा वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच आपण या क्षेत्रात जागतिक पातळीवर पहिल्या काही देशात राहण्याचा संकल्प पूर्ण करू असे ते म्हणाले.





