Asian Games 2023 : भारताने रचला इतिहास! प्रथमच जिंकली 80 हून अधिक मेडल्स; जाणून घ्या… 1951 पासूनच्या पदकांची आकडेवारी

हांगझोऊ :-आशियाई क्रीडा स्पर्धेत आजवरची सर्वात यशस्वी कामगिरी करत भारताने इतिहास घडवला. भारताने आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. ताजे वृत्त हाती आले तोपर्यंत भारताच्या नावावर 81 पदके असून ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत पहिल्या 10 दिवसांत 69 पदके जिंकणाऱ्या भारताने 11व्या दिवशी 71 चा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 71 पदके जिंकली नव्हती. ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळे या जोडीने मिश्र तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला 71वे पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घेऊया…..
आशियाई क्रीडा स्पर्धेला 1951 साली सुरुवात झाली. पहिलीच स्पर्धा राजधानी दिल्लीत झाली. त्यात भारताने यजमानपद भूषवताना एकूण 51 पदके जिंकली होती. त्यात 15 सुवर्ण, 16 रजत तर, 20 ब्रॉंझपदकांचा समावेश होता. त्या साली पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. यानंतर मात्र, भारताला पदकांचे अर्धशतक प्राप्त करण्यासाठी तब्बल तीन दशके प्रतीक्षा करावी लागली.
1982 साली नवी दिल्लीतील स्पर्धेत भारताने 13 सुवर्णांसह 57 पदके मिळवली होती. 1954 साली एकूण 17, 1958 साली 13 पदके मिळवली. 1990 साली तर भारतीय खेळाडूंची कामगिरी इतकी निराशाजनक होती की संघ पदकतालिकेत पहिल्या दहा क्रमांकातही प्रवेश करू शकला नाही. त्या वर्षी भारतानं केवळ 23 पदके जिंकली होती. त्यात एकच सुवर्णपदक होते. 1998 सालापासून मात्र, भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली. 2006 साली भारताने 50 पेक्षा जास्त पदके प्राप्त केली. या सालानंतर भारताच्या कामगिरीत खूपच प्रगती झाली व आतापर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्याने 50 पेक्षा जास्त पदके मिळवत आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी…
2010 साली 65 पदके जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 2018 साली 70 पदके मिळवली. आता यंदाच्या स्पर्धेत ऐंशीचा पल्ला भारताने पार केला असून उरलेल्या 4 दिवसांत मिळून पदकांची शंभरी गाठली जाणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. दरम्यान, 23 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ शहरात 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
✨ 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 𝗠𝗢𝗠𝗘𝗡𝗧 𝗔𝗧 𝗧𝗛𝗘 𝗔𝗦𝗜𝗔𝗡 𝗚𝗔𝗠𝗘𝗦! ✨
With this gold in archery, 🇮🇳’s medal tally at #AsianGames2022 now stands tall at an incredible 71 medals! 🇮🇳🏅
Our athletes’ dedication and hard work have made this moment possible🔥
Let’s keep the cheers… pic.twitter.com/mgrB9ackxV
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
पंतप्रधानांकडून भारतीय खेळाडूंचे कौतुक…
India shines brighter than ever before at the Asian Games!
With 71 medals, we are celebrating our best-ever medal tally, a testament to the unparalleled dedication, grit and sporting spirit of our athletes.
Every medal highlights a life journey of hard work and passion.
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या भारतीय खेळाडूंचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जास्त चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचेच हे यश आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट असून त्याबद्दल मी खेळाडूंचे अभिनंदन करतो, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.






