भारतीय हवाई दलाने रनवेऐवजी महामार्गावर उतरवले लढाऊ विमान; हवाई दलाकडून चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताकदीत आणखी भर पडली आहे.कारण आता यापुढे कोणत्याही युद्धजन्य किंवा आपातकालीन परिस्थितीमध्ये लष्कराचे कोणतेही लढाऊ विमान महामार्गावर उतरवता येणार आहे. भारतीय हवाई दलाने याची महत्त्वाची अशी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वर लष्कराच्या लढाऊ विमानांचे ट्रायल लँडिंग करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती उद्भवल्यावर रनवेऐवजी महामार्गावर लढाऊ विमानांचे लँडिग करता येणार आहे. भारतीय हवाई दलाने आंध्र प्रदेशातील बापटला येथे राष्ट्रीय महामार्ग 16 वर नव्याने बांधलेल्या 4.1 किमी इमर्जन्सी लँडिंग सुविधेची चाचणी घेतली असून ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी या चाचणी आणि सरावामध्ये भाग घेतला होता.
IAF fighter and transport aircraft carried out practice flying including circuit, approach and overshoot on newly constructed Emergency Landing Facility on NH-16 at Bapatla District in Andhra Pradesh on 29 Dec 22. pic.twitter.com/UQEcRqXASD
— SAC_IAF (@IafSac) December 29, 2022
सुखोई आणि तेजस एलसीए लढाऊ विमानांनी महामार्गावरील इमर्जन्सी लँडिंग सुविधेच्या चाचणीत भाग घेतला. लढाऊ विमानांनी 100 मीटर उंचीवर उड्डाण केले. त्यानंतर महामार्गावर यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग केला आणि नंतर पुन्हा विमानांनी आकाशात उड्डाण केले.
भारतीय हवाई दलाने (IAF) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटीमध्ये लिहिलं आहे की, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी 29 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात NH-16 वर नव्याने बांधलेल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. शिवाय या चाचणीवेळी सर्किट ऍप्रोच आणि ओवरशूट या तंत्रज्ञानाचा सराव करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये हवाई दलाचे वाहतूक विमान AN-32 आणि दोन सुखोई या लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.




