IND W vs ENG W : सलग तीन पराभवानंतर भारताच्या वाढल्या अडचणी! सेमीफायनल गाठता येणार का? जाणून घ्या समीकरण

IND W vs ENG W What’s Semi final Scenario for India : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मधील 20व्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडने विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला या विश्वचषकात सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी सेमीफायनलचे दरवाजे अद्याप खुले आहेत. यासाठी काही समीकरण आहे? जाणून घेऊया.
तीन संघांचे सेमीफायनलमधील स्थान पक्कं –
पॉइंट्स टेबलवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 5 सामन्यांपैकी 4 मध्ये विजय मिळवला असून एक सामना रद्द झाला. इंग्लंडने भारताविरुद्धच्या विजयासह 9 गुण मिळवले असून, नेट रनरेटच्या आधारावर ते दुसऱ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिका 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. या तीन संघांनी सेमीफायनलमधील आपली जागा पक्की केली आहे.
भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी काय करावे लागेल?
भारतीय महिला संघ सध्या 4 गुणांसह पॉइंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 5 सामने खेळले असून, 2 मध्ये विजय आणि 3 मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताचा पुढील सामना 23 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार असून, त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध लढत होईल. जर भारतीय संघ या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी झाला, तर ते सहजपणे सेमीफायनलमध्ये स्थान मिळवू शकतात.
हेही वाचा – IND vs AUS : ना धावा झाल्या, ना नेतृत्त्वाची छाप! गिलच्या नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
या तीन संघांसाठी सेमीफायनलचे दरवाजे जवळपास बंद –
पॉइंट्स टेबलवर न्यूझीलंड 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर बांगलादेश (सहावे), श्रीलंका (सातवे) आणि पाकिस्तान (आठवे) यांच्याकडे प्रत्येकी 2 गुण आहेत. या तीन संघांसाठी सेमीफायनल गाठणे आता जवळपास अशक्य आहे.
हेही वाचा – IND W vs ENG W : मंधाना-कौरची खेळी ठरली व्यर्थ, भारताने गमावला जिंकलेला सामना, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल
भारताची पुढील वाटचाल –
भारतीय संघासाठी आता पुढील दोन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांना मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करून सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी कस लावावा लागेल. भारतीय चाहत्यांच्या नजरा आता न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांवर खिळल्या आहेत.





