India Wins Asia-Cup : टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! आशिया चषकाच्या फायनलमध्ये यजमान जपानचा ४-१ ने पाडला फडशा
India Wins Asia-Cup : आशिया चषकाच्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान जपानचा ४-१ असा धुव्वा उडवत दिमाखात आशिया चषक २०२६ चे जेतेपद पटकावले.

India Wins Asia-Cup after beat Japan Final : भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघाने शनिवारी इतिहास रचला आहे. आशिया चषकाच्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान जपानचा ४-१ असा धुव्वा उडवत दिमाखात आशिया चषक २०२६ चे जेतेपद पटकावले. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा महानायक पुन्हा एकदा आशिष तानी पूर्ती (Ashish Tani Poorty) हा ठरला, ज्याने फायनलमध्ये दमदार हॅट्ट्रिक साधली, तर कर्णधार केतन कुशवाहानेही एक गोल करत मोलाचे योगदान दिले.
हाफटाईमपर्यंतच भारताची ३-० अशी एकतर्फी आघाडी!
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये अवघ्या ९० सेकंदांच्या आत भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि दुसऱ्याच मिनिटाला आशिष तानीने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या मजबूत डिफेन्सने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले.
🏑🥇 INDIA WIN GOLD 🥇🏑🇮🇳 India are the Champions of the Men’s U18 Asia Cup 2026! 🔥🏆A dominant and unforgettable campaign ends in glory as India rise to the top of Asia with power, skill, and outstanding teamwork . pic.twitter.com/8aAsmujM8S
— Asian Hockey Federation (@asia_hockey) June 6, 2026
दुसऱ्या क्वार्टरमध्ये २८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर आशिषने भारतासाठी दुसरा गोल केला. यानंतर ३० व्या मिनिटाला प्रल्हाद राजभरच्या पासवर कर्णधार केतन कुशवाहाने अत्यंत शांतपणे गोल करत हाफटाईमपर्यंत भारताला ३-० असे मजबूत स्थितीत आणले.
आशिषची हॅट्ट्रिक अन् पुरस्कारांवर भारताचा ताबा!
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३४ व्या मिनिटाला वरिंदर सिंहच्या उत्कृष्ट चालीमुळे भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर आशिषने गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि भारताची आघाडी ४-० अशी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये ५२ व्या मिनिटाला जपानच्या नुमाडा गाकुने पेनल्टी स्ट्रोकवर एकमेव गोल केला, जो जपानसाठी केवळ सांत्वनादायक ठरला. आशिष तानीला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ निवडण्यात आले, तो १३ गोलसह स्पर्धेत ‘टॉप स्कोरर’ ठरला. भारताच्या आयुषला ‘बेस्ट गोलकीपर’चा पुरस्कार मिळाला. महिलांमध्ये भारताची नौशीन नाझ १२ गोलसह टॉप स्कोरर राहिली.
हॉकी इंडियाकडून कोट्यवधींची बक्षिसे जाहीर!
भारतीय संघाच्या या सुवर्ण कामगिरीनंतर हॉकी इंडियाने पैशांचा पाऊस पाडला आहे. सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी १.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच कांस्यपदक (ब्रॉन्ज मेडल) जिंकणाऱ्या भारतीय अंडर-१८ महिला संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ५०,००० रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.





