नवी दिल्ली : करोनाविरोधातील लढाईत जगातील सर्व देश हे एकत्रपणे लढा देत आहेत. त्यातच भारत जगातील वेगवेगळ्या देशांना औषधांचा पुरवठा करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना करोनावर प्रभावी ठरणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
“करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा कसा सामना करायचा, याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली. भारताकडून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे मी त्यांना आश्वासन दिले आहे” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन दिली.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर सुद्धा पंतप्रधान मोदींनी करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाबद्दल चर्चा केली. “अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर करोनाच्या भारत आणि इजिप्तमधील स्थितीबद्दल चर्चा झाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरु आहेत, त्याला भारत आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत करेल” असे मोदींनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे.