भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राइक’, बगलिहार धरणाचे दरवाजे उघडले, व्हिडिओ समोर आला

जम्मू : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईचा पवित्रा कायम ठेवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारताने ‘वॉटर स्ट्राइक’द्वारे पाकिस्तानला दणका दिला. जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या बांधाचे दोन गेट उघडल्याने नदीचा प्रवाह वाढला, ज्यामुळे पाकिस्तानातील सियालकोट, गुजरात आणि हेड कादिराबाद भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
सिंदू जल करार स्थगित, पाणीप्रवाहावर नियंत्रण –
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंदू जल करार (Indus Waters Treaty) स्थगित केला. यानंतर केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास सुरुवात केली. बुधवारी (7 मे) भारताने चिनाब नदीतून 28,000 क्युसेक पाणी सोडले, ज्यामुळे पाकिस्तानात पूर अलर्ट जारी झाला होता. गुरुवारी पुन्हा बगलिहार बांधाचे गेट उघडल्याने नदीच्या जलस्तरात अचानक वाढ झाली, ज्यामुळे पाकिस्तानातील अनेक भाग जलमय झाले.
#WATCH | Jammu and Kashmir: Two gates at the Baglihar Hydroelectric Power Project Dam built on the Chenab River in Ramban have been opened.
(Latest visuals from the spot; shot at 3 pm today) pic.twitter.com/g6oYhT1BHb
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानवर काय परिणाम?
चिनाब नदी ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जीवनवाहिनी आहे. फैसलाबाद आणि हाफिजाबादसारख्या शहरांतील 80% लोकसंख्या या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. एकीकडे पाण्याची कमतरता आणि दुसरीकडे अचानक पूर यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
व्हिडीओतून उघड झाले वास्तव –
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओत चिनाब नदीचा वाढलेला प्रवाह आणि पाकिस्तानातील पूरग्रस्त भाग दिसत आहेत. स्थानिक प्रशासनाने सियालकोट आणि गुजरातमध्ये पूर अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानने भारतावर ‘वॉटर टेररिझम’चा आरोप केला आहे, तर भारताने ही कारवाई दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचा भाग असल्याचे म्हटले आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Latest visuals from Reasi’s Salal Dam built on Chenab River; 3 gates of the dam are seen open.
(Visuals shot at 4:45 pm today) pic.twitter.com/kkZlJ7PynZ
— ANI (@ANI) May 8, 2025
भारताची ठाम भूमिका –
भारताने स्पष्ट केले आहे की, चिनाब नदीवरील बांधांचे गेट उघडणे ही नियमित देखभाल प्रक्रिया आहे, परंतु करार स्थगित झाल्याने आता पाणीप्रवाहाची पूर्वसूचना देण्याची गरज नाही. यामुळे पाकिस्तानला पूर आणि दुष्काळ अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. भारताच्या या ‘वॉटर स्ट्राइक’ने पाकिस्तानची आर्थिक आणि कृषी व्यवस्था हादरली असून, पुढील काही दिवसांत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.





