IND Vs WI : ICC ची मोठी कारवाई ! भारत-वेस्ट इंडिज संघाला ‘ती’ चूक पडली महागात
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (IND Vs WI) यजमान भारताने २-१ च्या फरकाने आपल्या नावावर केली खरी, पण मालिका संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घेतलेल्या एका तडकाफडकी निर्णयाने क्रीडा जगतात खळबळ उडवून दिली आहे.

IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (IND Vs WI) यजमान भारताने २-१ च्या फरकाने आपल्या नावावर केली खरी, पण मालिका संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतलेल्या एका तडकाफडकी निर्णयाने क्रीडा जगतात खळबळ उडवून दिली आहे.
न्यू चंदीगड येथील पीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात (IND Vs WI) वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन करत भारताचा पराभव केला आणि मालिकेचा गोड शेवट साधला. सुरुवातीचे दोन सामने जिंकत भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली होती, मात्र अखेरचा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांना एका अनपेक्षित कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
या सामन्यात दोन्ही संघांकडून वेळेचे भान न राखले गेल्याने ‘स्लो ओव्हर रेट’चा नियम आडवा आला. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा तब्बल चार षटके मागे होता, तर वेस्ट इंडिजचा संघ दोन षटके मागे राहिला. भारताला या संथ गतीचा फटका सामन्यादरम्यानही बसला, ज्याचा पुरेपूर फायदा उठवत विंडीजने सामना जिंकला. या गंभीर उल्लंघनामुळे आयसीसीने दोन्ही संघांना जोरदार आर्थिक चपराक लगावली आहे.
एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय सामना पंच पॅनेलचे प्रकाश भट्ट यांनी ही दंडात्मक कारवाई घोषित केली. त्यानुसार भारतीय खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम, तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या मानधनातून १० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.
दोन्ही संघांच्या कर्णधारांनी (IND Vs WI) मैदानावरील आपली चूक निःशंकपणे मान्य केल्यामुळे या प्रकरणावर कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही. त्यामुळे मैदानातील विजयानंतरही दोन्ही संघांसाठी या मालिकेचा शेवट आर्थिक दंडाने झाला आहे.






