India vs Pakistan: पाकिस्तानला हरवून भारत विजयी होणार? भारतासाठी ‘ही’ सर्वात मोठी चिंता

India vs Pakistan- आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या लढतीसाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि यजमान पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. उद्या कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक देण्याच्या उद्देश्याने मैदानात उतरेल. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे. भारतीय संघाने बांगलादेशला ६ गड्यांनी नमवून तर पाकिस्तान न्यूझीलंडकडून पराभूत होऊन उदयाच्या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
दोन्ही संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत २०१७ मध्ये एकमेकांसमोर आले होते. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पाकिस्तानने भारतीय संघाला नमविले. लंडनमध्ये झालेल्या विजयातून पाकिस्तानचा कर्णधार रिझवान व पाकिस्तानच्या खेळाडूंना प्रेरणा घ्यावी लागणार आहे. परंतु त्यासाठी पाकिस्तानला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही विभागामध्ये सांघिक कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. दुबईत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाने येथील सर्वच गोष्टींशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतले आहे. मात्र पाकिस्तानचा संघ कराची येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारून दुबईमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर असतात त्यावेळी प्रत्येक खेळाडूवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतो. अशा परिस्थितीना पाकिस्तानपेक्षा भारतीय संघ चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम आहे.
आतापर्यंत कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म हा भरतीय संघाची डोकेदुखी ठरला होता. मात्र त्याने इंग्लंड आणि या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध फलंदाजी केली आहे, त्यानुसार त्याला लय सापडली असल्याचे दिसून आले आहे. त्याने ४१ धावांच्या आपल्या खेळीत ८ खणखणीत चौकार देखील लगावले होते. त्याच्या या खेळीने भारताला चांगली सुरुवात मिळाली होती. त्याचा दुसरा साथीदार असलेल्या शुभमन गिलने बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसे काढताना शतक झळकावले, त्यामुळे भारतीय संघाला बांगलादेशचे आव्हान सहज मोडून काढता आले होते.
पाकिस्तानसमोरील सर्वात मोठे आव्हान ?
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा फॉर्म आणि वृत्ती ही डोकेदुखी झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबरने ९० चेंडूत ६४ धावांची संथ खेळी केली. त्यामुळे त्याने केलेल्या खेळीचे कौतुक होण्यापेक्षा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. शिवाय, दुखापतीमुळे सलामीवीर फखर झमानच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. जमानच्या जागी इमाम उल हकची निवड पीसीबीने केली आहे. आता तो येथे संघात सामील झाला आहे. पहिल्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज खुशदिल शाहने ६९ धावांची आक्रमक खेळी केली होती. ती एकमेव खेळी पाकिस्तानसाठी सकारात्मक संकेत आहे. मात्र शाहला देखील धावा करण्यात संघर्ष करावा लागला होता, परंतु निवड समितीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने चमक दाखविली.
विराट कोहलीचा फॉर्म
भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे विराट कोहलीला त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता न येणे. गेल्या काही काळापासून तो पूर्वीसारखा लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याला पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी खेळण्यासाठी त्याला निश्चित वेगळे प्रयत्न करावे लागतील. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध दमदार खेळी केल्या आहेत. त्याने पाकिस्तान विरुद्ध ३ शतके व २ अर्धशतके झळकावली असून १६ लढतीमध्ये त्याची सरासरी ५२ च्या पुढे आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही आणि भारतीय फलंदाज त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन सुरुवातीपासूनच त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.
शमी – हर्षितची चमक
भारतीय गोलंदाजी चांगली दिसते. तंदुरुस्त झाल्यानंतर परतलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात पाच बळी टिपले. त्याला हर्षित राणा यांचीही चांगली साथ मिळाली. शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराहची उणीव भारताला जाणवणार नाही. अष्टपैलू हार्दिक पंड्या आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही त्याने भारताच्या आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवल्या.
कुणाला मिळणार संधी ?
गेल्या सामन्यात विजयी झालेल्या संघात भारत कोणतेही बदल करण्याची शक्यता कमी आहे. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे अंतिम अकरा जणांमध्ये राहतील हे निश्चित आहे. लोकेश राहुलने बांगलादेश विरुद्ध ४१ धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या लढतीत देखील ऋषभ पंतला बाहेरच राहावे लागण्याची शक्यता आहे.
संघ खालीलप्रमाणे आहेत:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आघा (उपकर्णधार), बाबर आझम, इमाम उल हक, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.





