IND Vs JPN : ऐतिहासिक लढत ! जपानच्या भूमीवर रंगणार महामुकाबला; भारत-जपान सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार?
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरण्याच्या इराद्याने भारतीय पुरुष क्रिकेट संघ (IND Vs JPN) सज्ज झाला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे रंगणाऱ्या या क्रीडा महाकुंभात भारतीय संघ रँकिंगच्या बळावर थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे.

IND Vs JPN : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरण्याच्या इराद्याने भारतीय पुरुष क्रिकेट संघ (IND Vs JPN) सज्ज झाला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे रंगणाऱ्या या क्रीडा महाकुंभात भारतीय संघ रँकिंगच्या बळावर थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे.
भारताचा पुढील प्रतिस्पर्धी अद्याप निश्चित झालेला नसला, तरी त्याआधी क्रिकेट जगतात एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. यजमान जपान आणि बलाढ्य भारतीय संघ (IND Vs JPN) यांच्यात थेट टी-२० लढत रंगणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दोन संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी जपानमध्ये पूर्ण ताकदीनिशी दाखल झाला आहे. भारतीय महिला संघाने आधीच अंतिम फेरीत धडक मारून भारताचे किमान रौप्यपदक पक्के केले असून श्रीलंकेला नमवून सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न त्या उराशी बाळगून आहेत.
Touchdown Tokyo 🛬
All smiles as #TeamIndia has arrived for their historic one-off T20I against Japan and the #AsianGames 2026 campaign 🙌 pic.twitter.com/GfoJBVVknY
— BCCI (@BCCI) September 21, 2026
महिला संघाच्या या दमदार कामगिरीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुरुष संघाकडे लागले आहे. जपानसारख्या नवख्या आणि तुलनेने दुर्बल संघाविरुद्ध भारताचे पारडे जड मानले जात असले, तरी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या या अनोख्या मैदानात जपान भारतीय संघाला कशी टक्कर देतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कधी आणि किती वाजता सुरु होणार सामना?
हा बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक टी-२० सामना (IND Vs JPN) मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता या लढतीला सुरुवात होईल, तर अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी ९:०० वाजता नाणेफेक पार पडेल. दुपारी १:०० वाजेपर्यंत चालणाऱ्या या सामन्यातून भारतीय संघ सुवर्णपदकाच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्यासाठी उत्सुक आहे.
भारतीय संघ
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, इशान किशन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, विप्रज निगम, वैभव सूर्यवंशी.
जपान संघ
केंडल फ्लेमिंग (कर्णधार), शिराय पाटमोर (यष्टीरक्षक), ॲलिस्टर फ्लेमिंग, बेंजामिन इटो-डेव्हिस, रिओ साकुरानो-थॉमस, कोहेई कुबोटा, वाटारू मियाउची, डेक्लान सुझुकी, इब्राहिम ताकाहाशी, माकोटो तानियामा, लाचलान यामामोटो-लेक, त्सुयोशी ताकाडा, चार्ली हारा-हिंझे, शोमा स्लेटर, जेक कुसुदा-नायर्न.






