IND vs AUS : पर्थच्या खेळपट्टीवर गिलच्या नेतृत्वाची कसोटी, भारताचा विजयी प्रारंभ होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IND vs AUS 1st ODI Optus Stadium Pitch Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्या, 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तो प्रथमच वनडे फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याच्यासमोर मोठे आव्हान असेल. या सामन्यासाठी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील खेळपट्टीचा अहवाल आणि इतर माहिती जाणून घेऊया.
ऑप्टस स्टेडियम खेळपट्टी अहवाल –
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवरील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथील खेळपट्टीवर चांगली उसळी आणि वेग मिळतो. पूर्वीचे वाका स्टेडियम जगातील सर्वात वेगवान खेळपट्टीसाठी प्रसिद्ध होते, परंतु ऑप्टस स्टेडियमवर ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरल्या जातात. या खेळपट्ट्या वाकासारख्या अति-वेगवान नसल्या, तरी येथे वेगवान गोलंदाजांना विशेषतः नव्या चेंडूसह चांगली मदत मिळते.
𝙍𝙚𝙖𝙙𝙮. 𝙎𝙚𝙩. 𝙍𝙚𝙡𝙤𝙖𝙙𝙚𝙙 🔃#TeamIndia Captain Shubman Gill and Australian skipper Mitchell Marsh meet ahead of the 1️⃣st ODI 🏆#AUSvIND | @ShubmanGill pic.twitter.com/MBPaB2iL0R
— BCCI (@BCCI) October 18, 2025
त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजांना सावधपणे खेळावे लागेल. सामना पुढे सरकताना खेळपट्टीवर फलंदाजी सुलभ होऊ शकते आणि नंतरच्या टप्प्यात फिरकी गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
भारतीय संघ ऑप्टस स्टेडियमवर प्रथमच वनडे सामना खेळणार आहे. यापूर्वी 2024 मध्ये याच मैदानावर भारताने कसोटी सामना खेळून विजय मिळवला होता. या मालिकेतील दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेड येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणार आहे.
ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड –
ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा वनडे फॉर्मेटमधील रेकॉर्ड अत्यंत निराशाजनक आहे. या मैदानावर खेळलेल्या तीन वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनीही या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.





