PM Modi US Visit: पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हे’ धाडसी प्रश्न विचारतील का? – जयराम रमेश

PM Modi US Visit – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे चांगले मित्र आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्या चर्चेवेळी मोदी धाडसाने काही विषय मांडतील का, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला.
प्रस्तावित मोदी-ट्रम्प चर्चेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यामधून त्यांनी मोदींना उद्देशून काही प्रश्न विचारले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून अमानवी पद्धतीने भारतीयांची पाठवणी करण्यात आली. त्याविषयीची भारताची नाराजी मोदी व्यक्त करतील का? कोलंबिया, व्हेनेझुएला या देशांनी त्यांच्या नागरिकांना आणण्यासाठी अमेरिकेला स्वत:ची विमाने पाठवली.
भविष्यात आम्हीही विमाने पाठवू असे ट्रम्प यांना मोदी सांगतील का? ट्रम्प यांनी गाझाबाबत विचित्र प्रस्ताव मांडला आहे. त्याविषयी भारताचा आक्षेप मोदी नोंदवतील का? हवामान बदलविषयक पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेपासून फारकत घेण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. त्या कृती जागतिक जबाबदारीतून अंग काढून घेणाऱ्या असल्याचे मोदी ध्यानात आणून देतील का? एच१बी व्हिसा व्यवस्थेचा लाभ दोन्ही देशांना झाला आहे. ती व्यवस्था कायम ठेवण्याचा आग्रह मोदी धरतील का, अशी विचारणा रमेश यांनी केली.
मोदी आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क यांचीही भेट घेतील. मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहनांची केवळ जुळणी नव्हे; तर त्या वाहनांचे उत्पादन करावे, असे मोदी त्यांना सांगतील का, असा प्रश्नही रमेश यांनी विचारला. अमेरिका दौऱ्यावर असणारे मोदी त्या देशाचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच, मस्क यांचीही भेट घेणार आहेत. त्यावेळी काय चर्चा होणार याविषयी उत्सुकता आहे.





