भारत अमेरिका व्यापार करार लवकरच: वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेतदरम्यान व्यापार कराराचा पहिला टप्पा लवकरच अस्तित्वात येणार आहे, असा दावा केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केला. मात्र एकूण परिस्थिती पाहता निश्चित तारीख सांगता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
भारत अमेरिकेच्या वस्तूवर जास्त आयात शुल्क लावतो म्हणून अमेरिकेने सुरुवातीला भारतीय वस्तूवर सरसकट पंचवीस टक्के आयात शुल्क लावले होते.
पहिल्या टप्प्यातील व्यापार करारामध्ये या बाबीवर विचार केला जात आहे. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर आणखी 25 टक्के आयात शुल्क लावले आहे. या बाबीचा पहिल्या टप्प्यात विचार केला जाणार नाही.
दोन्ही देशादरम्यानची चर्चा फिस्कटली असल्याच्या वृत्ताचा त्यांनी ठाम शब्दात इन्कार केला. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाबरोबर गेल्या आठवड्यात चर्चा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही देश परस्परांच्या कायम संपर्कात आहेत. मात्र ही चर्चा नेमकी कधी संपेल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
शिष्टमंडळ पातळीवरील शेवटची बोलणी 11 ऑगस्ट दरम्यान झाली आहे. त्यानंतर दोन्ही देशाचे वाणिज्य मंत्री परस्परांच्या संपर्कात आहेत. अमेरिकेचे राजदूत भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याचा करार लवकरच होईल याबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने भारताबरोबर दुर्मिळ खनिज उत्खनन आणि निर्मिती क्षेत्रात सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावरून दोन्ही देशांचे राजकीय संबंध चांगले आहेत हे दिसून येते.
फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशांनी परस्परादरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र जागतिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे वेळापत्रकावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे त्यांनी सुचित केले. प्रत्यक्षात जानेवारीपूर्वीच पहिल्या टप्प्याचा करार अपेक्षित होता. मात्र तो अजून होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर अमेरिकेने भारताविरोधात जरी आयात शुल्क लावले असले तरी भारताची अमेरिकेला होणारी निर्यात कमी झालेली नाही या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.





