भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे : डॉ. विजय भटकर

पुणे – वैदिक काळापासून भारताने प्रगतीचे अतिउच्च शिखर गाठल्याचे दाखले आपल्याला दिसून येतात. मध्यंतरीच्या काळात झालेल्या काही स्थित्यंतरामुळे आपण दोन पावले मागे सरकलो असलो, तरी आपली समृद्ध परंपरा, समृद्ध आध्यात्म, संस्कृती याचा परामर्श घेत पुन्हा भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे, असे मत संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंटस् ऑर्गनायझेशन अर्थात नृपो या संस्थेतर्फे डॉ. भटकर यांना संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नृपोचे अध्यक्ष सुरेश कानगो, उपाध्यक्ष सुरेश नातू, सचिव सुभाष कुलकर्णी आणि राजेंद्र माहुलकर आदी उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, एक काळ होता की भारतीय शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारी बौद्धिक पिढी ब्रेन ड्रेनच्या माध्यमातून पाश्चात्यांच्या प्रगतीत गुंतली होती. परंतु, आता माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ब्रेन गेनपर्यंत आपला प्रवास येऊन ठेपला आहे. स्टार्टअपच्या जगतात भारतात सर्वाधिक प्रयोग होत असून डिजिटल इकोनॉमी आपण प्रत्यक्षात आणून दाखवली आहे. आध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल. सूत्रसंचालन नृपोचे सचिव सुभाष कुलकर्णी यांनी केले, तर उपाध्यक्ष सुरेश नातू यांनी आभार मानले.





