Rupee at Record Low: मजबूत डॉलर आणि परकीय गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण माघारीच्या दबावाखाली रुपया बुधवारी २३ पैशांनी घसरून डॉलरमागे ९२.६३ रुपये (तात्पुरता) या विक्रमी नीचांकावर आला. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उंचावलेल्या असल्याने बाजाराचे मनोबल आणखी खालावले, असे फॉरेक्स ट्रेडर्सनी सांगितले. रुपया विक्रमी नीचांकावर – आंतरबँक परकीय चलन विनिमय बाजारात रुपया ९२.४२ वर उघडला आणि दिवसभर ९२.४१ ते ९२.४८ च्या दरम्यान व्यवहार होत राहिला. मात्र सत्राच्या अखेरच्या टप्प्यात घसरण होऊन तो ९२.६३ वर बंद झाला. व्यवहाराच्या दरम्यान एका टप्प्यावर तो ९२.६५ प्रति डॉलर या आजवरच्या सर्वात नीचांकावर पोहोचला होता. यापूर्वी मंगळवारी रुपया ९२.४७ पर्यंत घसरल्यानंतर ९२.४० प्रति डॉलर या विक्रमी नीचांकावर बंद झाला होता. रुपया का घसरतोय? एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट (कमोडिटी व करन्सी) जतीन त्रिवेदी यांनी सांगितले, “रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण वाढते आयात बिल आहे, जो रुपयावर सातत्याने दबाव निर्माण करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती उंच राहिल्या आहेत आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीत अडथळे येत असल्याने भारताचा आयात खर्च आणखी वाढण्याची भीती आहे.” एकूणच सध्याचे आर्थिक वातावरण कमकुवत आहे. कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ उंचावर राहू शकतात, त्यामुळे रुपयावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्सचे ट्रेझरी हेड अनिल कुमार भन्साळी म्हणाले, “प्रमुख केंद्रीय बँकांच्या चलनविषयक आढावा बैठकांपूर्वीच रुपया नव्या नीचांकावर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही तो ९२.५० च्या पातळीपुढे जाण्यास परवानगी दिली.” त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे, कारण त्यावरून डॉलरची दिशा ठरेल आणि त्याचा थेट परिणाम रुपयावर होईल. येत्या काळात रुपया डॉलरच्या तुलनेत ९२.२५ ते ९२.९५ च्या दरम्यान कमकुवत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबुती मोजणारा डॉलर इंडेक्स ०.०५ टक्क्यांनी वाढून ९९.६२ वर व्यवहार करत होता. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड जवळपास स्थिर राहून १०३.४ डॉलर प्रति बॅरलवर होते. हेही वाचा – आयटी शेअर्समधील तेजीने बाजार सलग तिसऱ्या दिवशी वधारला; सेन्सेक्स 633 अंकांनी उसळला, निफ्टी 23,777 वर बंद रुपयाच्या कमकुवतपणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम – १. महागाई वाढेल – रुपया घसरल्याचा सर्वात मोठा फटका महागाईला बसतो. भारत कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अनेक आवश्यक कच्च्या मालासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. रुपया घसरला की या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात. त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेल, गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होतो. २. तेल आयात महागेल – भारत आपल्या गरजेच्या सुमारे ८५ टक्के तेल आयात करतो आणि त्याचे पेमेंट डॉलरमध्ये केले जाते. रुपया घसरल्यावर तेल आयाताचा खर्च झपाट्याने वाढतो. परिणामी एकतर सरकारवर अनुदानाचा भार वाढतो किंवा तेल कंपन्या किमती वाढवतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल महागते, वाहतूक खर्च वाढतो आणि संपूर्ण पुरवठा साखळीवर याचा परिणाम जाणवतो. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आधीच कच्चे तेल व एलपीजी पुरवठ्याबाबत अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत रुपयाची कमकुवतता तेल आयात आणखी महाग करून अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त दबाव टाकू शकते. ३. परकीय गुंतवणूक घटेल – कमकुवत रुपया परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (FIIs) धोका वाढवतो, कारण त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य घटू शकते. त्यामुळे ते भारतीय बाजारातून पैसा काढून घेऊ शकतात, ज्यामुळे शेअर बाजारात घसरण आणि अस्थिरता वाढते. ४. कर्जाचा भार वाढेल – परकीय कर्ज घेतलेल्या कंपन्या आणि सरकारसाठी परिस्थिती अधिक कठीण बनते. डॉलरमध्ये घेतलेले कर्ज फेडण्यासाठी जास्त रुपये खर्च करावे लागतात. यामुळे कंपन्यांच्या ताळेबंदावर दबाव येतो आणि नफ्यावर परिणाम होतो. ५. चालू खाते तूट वाढेल – कमकुवत रुपया निर्यातीला काही प्रमाणात स्पर्धात्मक बनवतो; परंतु भारताचे आयात बिल, विशेषतः तेलाचे इतके मोठे आहे की एकूणच चालू खाते तूट वाढण्याची भीती असते. ६. कॉर्पोरेट नफ्यावर परिणाम – ज्या कंपन्यांचा कच्चा माल किंवा यंत्रसामग्री आयातीवर अवलंबून आहे, त्यांची उत्पादन लागत वाढते. त्यामुळे नफा घटतो आणि शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसतो. एकूणच, रुपयाची सातत्यपूर्ण घसरण ही अर्थव्यवस्थेसाठी एक इशारा संकेत आहे. ही घसरण दीर्घकाळ सुरू राहिल्यास महागाई, गुंतवणूक आणि विकास दरावर व्यापक परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.