India 2036 Olympics : २०३६ चे ऑलिम्पिक भारतात होणार? आयओसीसमोर ३० मिनिटांचे खास सादरीकरण अन् ‘या’ शहरावर विशेष भर
India 2036 Olympics Bid : भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांच्या आयोजनासाठी आपली दूरदृष्टी आणि आराखडा आयओसीच्या 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर सादर केला आहे.

India presents its 2036 Olympics and Paralympics hosting blueprint : भारतात ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदाचे स्वप्न आता एक पाऊल पुढे सरकले आहे. २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर (आयओसी) आपले व्हिजन आणि तयारीचा आराखडा सादर केला. २६ नोव्हेंबरला आयओसीच्या फ्युचर होस्ट कमिशनसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत क्रीडा सुविधांच्या विकासापासून आयोजनापर्यंतची माहिती देण्यात आली, ज्यात संभाव्य यजमान शहर अहमदाबादच्या क्षमतांवर विशेष भर होता.
अहमदाबादच्या क्रीडा पायाभूत सुविधांवर अर्धा तास सादरीकरण –
भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या निवेदनानुसार, भारताचे हे सादरीकरण सुमारे ३० मिनिटे चालले. त्यानंतर कोलिंडा ग्राबर-कितारोविच यांच्या अध्यक्षतेखालील आयओसीच्या नऊ सदस्यांशी २० मिनिटे चर्चा झाली. यामध्ये अहमदाबादमधील विद्यमान क्रीडा पायाभूत सुविधा, प्रस्तावित मैदाने आणि विकासाच्या योजनांची माहिती दिली. तसेच केंद्र सरकार, गुजरात सरकार व अहमदाबाद प्रशासनाचे सहकार्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आणि दीर्घकालीन तयारीचा आराखडाही यावेळी मांडण्यात आला.
यजमानपदाच्या शर्यतीत भारताला सहा देशांचे आव्हान –
The Indian Olympic Association (IOA) has presented India’s vision and Ahmedabad’s preparedness to the IOC for hosting the 2036 Olympic and Paralympic Games.
#India2036 #Olympics #Ahmedabad #IndianSports https://t.co/edNcITH9YH
— India TV Speed News (@itvspeednews) November 27, 2026
२०३६ मधील ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत भारत एकटा नसून आणखी सहा देशांचे तगडे आव्हान आहे. जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कीये यांनीही या भव्य आयोजनात रस दाखवला आहे. अशा प्रकारे भारतासह एकूण सात देश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी रिंगणात उतरले आहेत. यापैकी तुर्कीयेने यापूर्वीच फ्युचर होस्ट कमिशनसमोर आपले पहिले सादरीकरण पूर्ण केले असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबरमध्ये गुप्त सर्वेक्षण अन् मार्चमध्ये निर्णायक मूल्यांकन –
India Places Bid to Host 2036 Olympic and Paralympic Games
#bid #Olympics #paraolympics #2036 #INDIA #northeastlive https://t.co/A3uZmhlU6R
— Northeast Live (@NELiveTV) November 27, 2026
भारताच्या दावेदारीसाठी पुढचा महत्त्वाचा टप्पा डिसेंबरमध्ये असेल. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयओसी एक गुप्त सर्वेक्षण करणार असून, त्यातून ऑलिम्पिक यजमानपदाबाबत सर्वसामान्य भारतीय जनतेची मते जाणून घेतली जातील. या सर्वेक्षणाचे निकाल पुढील वर्षी मार्चमधील मूल्यांकनात निर्णायक ठरतील. त्यानंतर स्ट्रॅटेजिक डायलॉग टप्पा सुरू होईल, ज्यात इच्छुक देशांना प्राथमिक प्रश्नावलीची उत्तरे आणि आयोजनासाठी आवश्यक आर्थिक हमी सादर करावी लागेल.
ऑनलाइन बैठकीला देशातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती –
गुरुवारी झालेल्या या ऑनलाइन सादरीकरणात भारताचे दिग्गज प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, क्रीडा सचिव हरी रंजन राव, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या निवर्तमान अध्यक्ष पी. टी. उषा, आयओसीतील भारतीय प्रतिनिधी नीता अंबानी आणि आयओए खेळाडू आयोगाच्या प्रमुख बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांचा समावेश होता. तसेच गुजरातचे क्रीडामंत्री हर्ष संघवी, आयओएचे सीईओ रघुराम अय्यर व इतर अधिकारीही उपस्थित होते.





