India-Pakistan । भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव; मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला.
भारतीय सुरक्षा दलांनी भारताच्या अनेक सीमावर्ती भागात पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले वेळीच उधळून लावले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूर, जैसलमेर, पोखरण, जालंधर आणि भूज यासारख्या मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला
भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले. एवढेच नाही तर भारताने कठोर कारवाई करत पाकिस्तानचे तीन लढाऊ विमान पाडले आहेत. यामध्ये दोन JF17 आणि एक F16 लढाऊ विमानांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सध्या भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच सीमालगत भागात सावधगिरी बाळगली जात आहे.




