U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत युवा टीम इंडिया बनली ‘आशिया चॅम्पियन’!
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात युवा टीम इंडियाने विश्वविक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारली आणि आशिया कपवर (U19 Asia Cup 2026) आपले नाव कोरले.

U19 Asia Cup 2026 : अल अमेरात क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या अंडर-१९ आशिया कप स्पर्धेच्या (U19 Asia Cup 2026) अंतिम सामन्यात क्रिकेटच्या थराराचा कळस पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात युवा टीम इंडियाने विश्वविक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारली आणि आशिया कपवर (U19 Asia Cup 2026) आपले नाव कोरले. पराभवाच्या छायेत असलेल्या भारतीय संघाने केवळ एक विकेट शिल्लक असताना अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत हा अविस्मरणीय विजय संपादन केला.
विजयासाठी मिळालेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदन यांनी भारतीय डावाची भक्कम पायाभरणी केली. आर्यवीरने ६१ चेंडूत ५८ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली, तर कर्णधार लक्ष्यने १०१ चेंडूत ८० धावांचे संयमी योगदान देत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जोडी बाद होताच सामन्याचे चित्र पालटले. पाकिस्तानी गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताच्या मधल्या फळीला खिंडार पाडले आणि सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
४१.३ षटकांनंतर भारताची अवस्था ८ बाद २५२ अशी बिकट झाली होती. सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकला असताना मनल चौहान आणि मोहित उल्वा यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत सामन्यात मोठा ट्विस्ट आणला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी (U19 Asia Cup 2026) अवघ्या ३५ चेंडूत ५७ धावांची तुफानी भागीदारी रचली.
मनल चौहानने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ४७ धावांची स्फोटक खेळी केली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला आणि भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा चुकला.
अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज होती आणि केवळ एक विकेट हातात होती. अशा दबावाच्या परिस्थितीत मोहित उल्वाने ४९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्याने एकेरी धाव घेत व्यंकटाला स्ट्राईक दिली. व्यंकटानेही संधीचे सोने करत एक चौकार आणि एक धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर मोहितने एक धाव घेत भारताची धावसंख्या ९ बाद ३३० वर नेऊन ठेवली.
अंतिम षटकात विजयाची समीकरणे अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपली होती. पाकिस्तानचा गोलंदाज अहमद हुसेनने टाकलेला पहिला चेंडू निर्धाव गेला, पण त्यानंतर वाईडच्या रूपात भारताला एक महत्त्वाची अवांतर धाव मिळाली.
पुढच्या चार चेंडूंवर मोहित आणि व्यंकटाने एकेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट केली. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज होती आणि मोहित उल्वा स्ट्राईकवर होता. संपूर्ण स्टेडियमचा श्वास रोखला गेला असताना मोहितने दडपण झुगारून देत खणखणीत चौकार ठोकला आणि भारताला १ विकेट राखून ऐतिहासिक विजय (U19 Asia Cup 2026) मिळवून दिला.






