India-Myanmar border । भारतीय लष्कराला मोठे यश, भारत-म्यानमार सीमेवर १० दहशतवाद्यांचा खात्मा

India-Myanmar border । भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने १० दहशतवाद्यांना ठार मारले आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. अलीकडेच भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर आता पुन्हा भारताच्या पूर्व सीमेवरील ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे.
लष्कराच्या पूर्व कमांडने रात्री उशिरा X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “गुप्त माहितीच्या आधारे, भारत-म्यानमार सीमेजवळ असलेल्या चंदेल जिल्ह्यातील खेगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्या. त्यानंतर, आसाम रायफल्सच्या युनिटने १४ मे २०२५ रोजी स्पीअर कॉर्प्स अंतर्गत एक ऑपरेशन सुरू केले.”
“ऑपरेशन दरम्यान, संशयित अतिरेक्यांनी सैनिकांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सैनिकांनी ताबडतोब नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. गोळीबारात १० अतिरेकी ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.”
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून ही कारवाई एक मोठे यश मानले जात आहे. लष्कराच्या पूर्व कमांडनुसार, ही कारवाई अजूनही सुरू आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी केंद्र सरकारने भारत आणि म्यानमारमधील १,६१० किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा कुंपण आणि रस्ते बांधण्यास मान्यता दिली होती. मणिपूरमध्ये घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता.
Acting on specific intelligence on movement of armed cadres nearby New Samtal village, Khengjoy Tehsil, #Chandel District near the #Indo_MyanmarBorder, #AssamRifles unit under #SpearCorps launched an operation on 14 May 2025.
During the operation,… pic.twitter.com/KLgyuRSg11
— EasternCommand_IA (@easterncomd) May 14, 2025





