Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट; पावसाबाबत पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रासाठीही इशारा
Weather update : जागतिक हवामान संघटनेने (WMO) २०२६ मधील मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Weather update : भारत हा कृषीप्रधान देश असून येथील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. दरम्यान, यंदाच्या मान्सूनबाबतचा पहिला अंदाज समोर आला असून त्यानुसार देशावर ‘अस्मानी संकट’ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हा प्रभाव कायम राहिला तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.
गेल्या वर्षी देशात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या मान्सूनकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही एल निनोचा परिणाम जाणवू शकतो, त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र काही हवामान तज्ज्ञांनी दिलासा देताना सांगितले की, एल निनोचा प्रभाव नेमका किती असेल याबाबत आत्ताच ठाम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मे महिन्यानंतर मान्सूनची खरी स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नसले तरी यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे सावट असल्याचे चित्र दिसत आहे.





