India-Maldives Deal : भारत-मालदीवमध्ये १३ सामंजस्य करार

माले – भारत आणि मालदीवदरम्यान १३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून या अंतर्गत मालदीवमध्ये फेरी सर्व्हिस वाढवण्यासाठी भारत मालदीवला १०० दशलक्ष एमव्हीआर (मालदीव रुफिया- मालदीवचे चलन) देणार आहे.
मालदीवची सागरी संलग्नता वाढवण्यासाठी आणि स्थानिक समुदायाच्या जीवनमानामध्ये प्रगती करण्याच्या उद्देशाने हा निधी दिला जाणार आहे.
रविवारी स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार हे समुदाय विकास प्रकल्यांसाठी भारतीय अनुदान सहाय्याच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आहेत, मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मालदीव सरकारच्या वतीने परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील आणि मालदीवमधील भारताचे उच्चायुक्त जी बालसुब्रमण्यम यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. अंमलबजावणी संस्थेच्या वतीने वाहतूक आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मोहम्मद अमीन यांनी स्वाक्षरी केली.
दोन्ही मंत्र्यांनी भारत सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि मालदीवमधील समुदायांवर त्याचा परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केला.





