“भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवली”; शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा

India Russian Oil | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताबाबत विविध दावे करत आहे. यातच त्यांनी आणखी एक दावा केला आहे. भारताने रशियाकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आशिया दौऱ्यात आसियान (ASEAN) शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. मात्र भारताने तत्काळ या दाव्याला खोटे ठरवले आहे.
भारताने तत्काळ या दाव्याला खोटे ठरवत स्पष्ट केले की, तेल खरेदी हा भारताचा राष्ट्रीय हितांवर आधारित स्वतंत्र निर्णय आहे आणि कोणत्याही बाह्य दबावापुढे भारत झुकणार नाही. दरम्यान, ट्रम्प प्रशासनने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी तेल निर्यातीवर कठोर कारवाई करत आहे.
रशियन तेल कंपन्यावर निर्बंध
या निर्बंधांमध्ये रशियन तेल कंपन्या ‘रोसनेफ्ट’ आणि ‘लुकॉइल’वर कठोर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादले आहेत. जेणेकरून रशिया तेलाच्या कमाईतून आपल्या लष्करी कारवाया सुरू ठेवू शकणार नाही. अमेरिकेत या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तांना फ्रीज केले जाईल, अमेरिकन नागरिकांना त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई असेल.
तसेच जागतिक भागीदार देशांनाही या कंपन्यांपासून व्यावसायिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन कंपन्या मिळून रशियाच्या सुमारे 45 टक्के तेल निर्यातीवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच या पावलामुळे रशियन ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होईल, असा अमेरिकेचा दावा आहे. India Russian Oil |
भारताचे स्पष्टीकरण
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरू ठेवणार आहे. जोपर्यंत संयुक्त राष्ट्र स्तरावर अधिकृत निर्बंध लागू होत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश भारताला कोणत्या देशाकडून तेल घ्यायचे, हे ठरवू शकत नाही. ऊर्जा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतासाठी स्वस्त आणि स्थिर तेल पुरवठा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही आपल्या ऊर्जा सुरक्षेवर तडजोड करू शकत नाही. India Russian Oil |
भारताबाबत ट्रम्प यांनी असा दावा पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही ते असेच काही बोलले होते. मात्र, भारताने यापूर्वीही स्पष्ट केले की, त्याने अमेरिकेच्या कोणत्याही दबावाखाली रशियन तेल खरेदीत कपात केलेली नाही. भारताने यापूर्वी अनेकदा पुनरुच्चार केला आहे की, रशियाकडून ते कच्च्या तेलाची आयात आपल्या ऊर्जा हितांनुसार सुरू ठेवेल आणि त्याचा उद्देश जागतिक ऊर्जा स्थिरता राखणे आहे. दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे.
चीनबाबत ट्रम्प काय म्हणाले?
दुसरीकडे ट्रम्प पुढील आठवड्यात दक्षिण कोरियात चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत रशियन तेल खरेदी, कृषी व्यापार आणि फेंटानिल ड्रग संकट यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. याबाबत ते म्हणाले, ‘मला आमच्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा असे वाटते, यावेळी शी जिनपिंगही त्यांच्या गोष्टी मांडतील. चीनने रशियन तेल खरेदीत मोठी घट केली आहे. ही बैठक ‘मोठा करार’ ठरू शकते. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करू. ही बैठक अमेरिका-चीन संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी असेल,’ अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. India Russian Oil |
हेही वाचा :





