BJP Mla Bribe Case: भाजप आमदाराला 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; दोन स्वीय सहाय्यकही जाळ्यात
BJP Mla Bribe Case: लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'तंर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP Mla Bribe Case: कर्नाटकातील शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. चंद्रू लमानी यांना लोकायुक्त पोलिसांनी शनिवारी एका कंत्राटदाराकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईत आमदारांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही (PA) अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार विजय पुजार यांनी लघु सिंचन विभागांतर्गत केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी आणि तांत्रिक क्लिअरन्स मिळवण्यासाठी आमदार लमानी यांनी ११ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लोकायुक्तांनी त्यांच्या हॉस्पिटलवर छापा टाकला आणि त्यांना रंगेहात पकडले.
दोन स्वीय सहाय्यक अटकेत –
या ट्रॅप ऑपरेशनदरम्यान आमदारांसोबतच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मंजूनाथ वाल्मीकि आणि गुरुनाईक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या’तंर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजसेवक ते आमदार… असा आहे प्रवास –

डॉ. चंद्रू लमानी हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी एमडी (जनरल मेडिसिन) पदवी प्राप्त केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सरकारी रुग्णालयात सेवा दिली होती. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत शिरहट्टी (SC राखीव) मतदारसंघातून ते पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर निवडून आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत ट्युशन आणि एसएससी कोचिंग देणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, या कारवाईमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
भाजपची कोंडी –
राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच जुंपलेली असताना, भाजप आमदारालाच रंगेहात अटक झाल्याने पक्षाची मोठी अडचण झाली आहे. या प्रकरणावर अद्याप भाजपच्या वतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. लोकायुक्त पोलीस सध्या या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करत आहेत.





