महिलांवरील अत्याचारांवरून भारताची पाकिस्तावर टीका
न्यूयॉर्क – महिलांवरील, विशेषतः अल्पसंख्याक समुदायांमधील वाढत्या लैंगिक हिंसाचाराला तोंड देण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानचा रेकॉर्ड लज्जास्पद आहे, असे मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचारावरील खुल्या चर्चेत बोलताना भारताचे चार्ज डी अफेअर्स एल्डोस मॅथ्यू पुन्नूस म्हणाले.
१९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात लाखो महिलांवर लैंगिक हिंसाचाराचे जघन्य गुन्हे ज्या प्रकारे केले ते लज्जास्पद रेकॉर्ड आहे. ही निंदनीय पद्धत आजही अखंडपणे आणि शिक्षेशिवाय सुरू आहे, असे पुन्नूस म्हणाले.
पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्यांसाठी जीवनरक्षक सेवा आणि संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण धोरणे ओळखणेया विषयावरील चर्चेदरम्यान काश्मीरवरून भारतावर निशाणा साधल्यानंतर पुन्नूस यांनी पाकिस्तानवर ही टीका केली.
पुनूस यांनी पाकिस्तानवर धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याक महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचे शस्त्र म्हणून वापर केल्याचाही आरोप केला. त्यांनी पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवर गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी कृत्यांना वैध ठरवल्याचा आरोपही केला.





