भारताला परदेशी प्रशिक्षक मिळणार? BCCIने दिलेत संकेत, मंग राहुल द्रविड यांचं काय होणार?

BCCI – मागील काही वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. २०१३ मध्ये भारताने इंग्लंडला अंतिम सामन्यात मात देत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताला प्रत्येक स्पर्धेमध्ये संघर्ष करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला सेमीफायनल सामन्यात इंग्लंड संघाकडून निराशाजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतील संघाचे अपयश पाहता बीसीसीआयकडून आजपर्यंत कधीही न करण्यात आलेले बदल केले गेले.
सूर्यकुमार यादवला ICC टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन
त्याचबरोबर नुकतंच श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टी-२० संघाची निवड पाहता बीसीसीआयच्या बदलत्या हालचालींची पूर्णपणे कल्पना येत आहे. कारण विराट कोहली आणि भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शार्मसह केएल राहुल, ऋषभ पंत व्यतिरिक्त इतर काही खेळाडूंना टी-२० संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघ निवड करताना युवा खेळाडूंना संधी देण्याकडे बीसीसीआयने लक्ष्य दिल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर टी-२० फॉरमॅटसाठी संघाचे नेतृत्व आता हार्दिक पंड्याकडे कायमचे दिले जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. सध्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक कर्णधार तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद दिले गेले आहे. कर्णधारपद हे रोहित शर्माच्या दुखापतीमुळे हार्दिककडे आले असल्याचे म्हटले जात असले तरी, ते कायमचे दिले गेले आहे असेच चित्र दिसत आहे.
सूर्यकुमार यादवला ICC टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन
संघात मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर आता बीसीसीआय या छोट्या फॉरमॅटसाठी नवीन प्रशिक्षकाची किंवा एखाद्या परदेशी प्रशिक्षकाची निवड करण्याच्या बेतात असल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅंडन मॅक्युलमने ज्याप्रमाणे इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटला वेगळी दिशा दिली, त्याचप्रमाणे भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये बदल घडवण्यासाठी एखादा परदेशी प्रशिक्षक निवडला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ७ वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये परदेशी प्रशिक्षक पाहावयास मिळेल.
सध्याचे भारतीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कसोटी आणि वनडे क्रिकेटसाठी कायम ठेवले जाऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की,”आमच्या तत्त्वांनुसार चालणारा परदेशी प्रशिक्षक आढळल्यास त्याला नक्कीच संधी दिली जाईल. फक्त कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडे बघा. ब्रेंडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यामुळे नक्की आम्ही नक्की विचार करु, मात्र सध्यातरी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचं आहेत.”
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा टी२० संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.





