सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये पंचसुत्रीवर सहमती

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठीच्या पंचसुत्रीवर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली. त्यानुसार, तातडीने सैन्यमाघारीची आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊले उचलण्याची तयारी चीनने पुन्हा एकदा दर्शवली.
सीमेवर म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत चीनी कुरापतींमुळे चार महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रशियाची राजधानी मॉस्कोत द्विपक्षीय बैठक झाली. तब्बल अडीच तास चाललेल्या त्या बैठकीत सीमेवरील सध्याची स्थिती दोन्ही देशांच्या हिताची नसल्याचे मान्य करण्यात आले. त्यातून पंचसुत्रीवर सहमती झाली.
त्यानुसार, सीमेवर तैनात असणाऱ्या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चर्चा सुरू रहावी, वादाचे कारण ठरणाऱ्या ठिकाणांपासून तातडीने सैन्य हटवावे, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये योग्य अंतर असावे आणि तणाव कमी करण्यासाठी पाऊले उचलली जावीत या मुद्द्यांवर दोन्ही देश सहमत झाले. अर्थात, सैन्यमाघार आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुठली निश्चित कालमर्यादा नमूद करण्यात आली नाही.
चर्चेवेळी भारतीय शिष्टमंडळाने चीनी सैनिकांच्या हालचाली आणि लष्करी सामग्रीच्या जमवाजमवीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. चीनी सैनिकांची चिथावणीखोर वर्तणूक द्विपक्षीय करारांचा अनादर असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चा दोन्ही देशांमधील आठवडाभरातील दुसरी उच्चस्तरीय बैठक ठरली.
याआधी मागील शुक्रवारी मॉस्कोतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघई यांची बैठक झाली होती. मात्र, संरक्षण मंत्र्यांमधील चर्चेनंतरही दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने येऊन गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे सीमेवरील स्थिती आणखीच गंभीर बनल्याचे चित्र पुढे आले.
आता परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेनंतर तरी स्थितीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळ्यांवरही चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. मात्र, त्यामध्ये दिलेला शब्द चीन पाळत नसल्याचेच दिसून येत आहे.





