Donald Trump : कॉंग्रेसने भारत-अमेरिका व्यापार करारावरून (Donald Trump) मोदी सरकारवरील शाब्दिक हल्ल्याचे सत्र कायम ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१९ मध्ये अब की बार ट्रम्प सरकार असा नारा दिला. मात्र, अंतरिम व्यापार करार अब की बार ट्रम्प से हार दर्शवणारा असल्याचे उपरोधिक भाष्य त्या पक्षाने केले. व्यापार करारावरून कॉंग्रेस सातत्याने मोदी सरकारला घेरत आहे. त्या टीकेचे सत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पुढे नेले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आयात शुल्क लादले. ते अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ते पाहता अंतरिम करार रोखला जावा. शेतकरी हितांच्या रक्षणासाठी कराराच्या आराखड्यावर नव्याने चर्चा केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. मोदी सरकारने कराराबाबत घाई केली. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली असती; तर भारत अधिक मजबूत स्थितीत असू शकला असता. कुठलाही करार देवाण-घेवाण यासंदर्भात असतो. मात्र, अंतरिम व्यापार करारांतर्गत भारताने केवळ दिले आहे. मोदी यांनी कराराची घोषणा करण्यास ट्रम्प यांना भाग पाडले. तशी गरज का भासली, या प्रश्नाचा थेट संबंध लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेशी आहे. राहुल यांनी संसदेत बाह्यसुरक्षेच्या आघाडीवर मोदींना आलेले अपयश अधोरेखित केले. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि इतर बातम्यांना प्राधान्य मिळावे या उद्देशातून कराराच्या घोषणेसाठी घाई करण्यात आली, असा दावा रमेश यांनी केला.