सीमेवरील शांततेने चीन खूश ! परराष्ट्र मंत्री वांग यी-अजित डोभाल यांच्यात भेट ; चीनने भेटीविषयी काय म्हटले?

India China । अमेरिकेसोबतच्या टॅरीफवरून सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारताला शेजारी देश चीनकडून दिलासा मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण सध्याच्या वातावरणावरून दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असून सीमेवर स्थिरता निर्माण होत आहे. त्यातच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्यात आज भेट झाली. या भेटीदरम्यान संबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसून आली. भेटीदरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, “आता सीमेवर स्थिरता निर्माण झाल्याचा त्यांना आनंद आहे. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे “असेही त्यांनी सांगितले. यामुळे दोन्ही देशांच्या विकासाला गती मिळेल.
वांग यी भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. यादरम्यान, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीदरम्यान वांग यी यांनी, “गेल्या वर्षाच्या अखेरीस विशेष प्रतिनिधींच्या चर्चेचा २३ वा टप्पा खूप चांगला होता. त्या बैठकीत आम्ही मतभेद सोडवण्यासाठी आणि सीमांवर स्थिरता राखण्यासाठी सहमती दर्शवली, जी महत्त्वाची ठरली. आम्ही विशेष उद्दिष्टे देखील निश्चित केली. आता सीमांवर स्थिरता निर्माण झाली आहे ही आनंदाची बाब आहे.”असे त्यांनी म्हटले.
वांग यांनी अजित डोवाल यांचे कौतुक का केले ? India China ।
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अजित डोवाल यांचे कौतुक करताना, ”भारतीय बाजूचे विशेष प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या (अजित डोवाल) प्रयत्नांचे कौतुक करतो. आता आपल्याकडे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आणि विकसित करण्याची एक महत्त्वाची संधी आहे.”असे त्यांनी म्हटले.
अमेरिकेपासून दूर असताना चीन भारताच्या जवळ India China ।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर नाराज आहेत. अशा परिस्थितीत, भारताचे चीनशी सुधारणारे संबंध महत्त्वाचे ठरतील. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प भारतावर नाराज आहेत आणि भारताने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे ट्रम्प संतापले आणि त्यांनी भारतावर ५० टक्के कर लादला.





