India Beat Pakistan : सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय; सुहेल भटचे दोन गोल, अतिरिक्त वेळेत पाकिस्तानचा कडवा प्रतिकार
India Beat Pakistan : सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला.

India Beat Pakistan Suhail Bhat Brace SAFF Championship 2026 : सॅफ (SAFF) चॅम्पियनशिप २०२६ च्या पहिल्याच हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करत स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे. या रोमहर्षक विजयामुळे भारताने आपल्या खात्यात पूर्ण ३ गुण जमा केले आहेत. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये पूर्ण वर्चस्व राखत भारताने ३-० अशी एकतर्फी भक्कम आघाडी घेतली होती. अखेरच्या इंज्युरी टाईममध्ये पाकिस्तानने दोन गोल करून पुनरागमनाचा आक्रमक प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने संयम राखत विजय खेचून आणला.
सुहेल भटची जादू; अवघ्या १९ मिनिटांत दोन गोल
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय आक्रमक फळीने पाकिस्तानच्या बचावफळीवर जोरदार दबाव आणला. खेळाच्या १३ व्या मिनिटाला मुहम्मद सुहेलने डाव्या बाजूने चपळाईने चेंडू पुढे नेला आणि गोलपोस्टजवळ पास दिला, ज्यावर सुहेल भटने कोणताही गाफीलपणा न दाखवता चेंडू थेट जाळ्यात ढकलून भारताचे खाते उघडले. यानंतर १९ व्या मिनिटाला सूर्यकुमारने अप्रतिम पास देत सुहेलसाठी पुन्हा संधी निर्माण केली. भटने उजव्या कोपऱ्यात अचूक फटका मारून भारताची आघाडी २-० वर नेली.
किपगेनचा तिसरा गोल; पाकिस्तानने पेनल्टी वाया घालवली
India defeated Pakistan 3-2 in their SAFF Championship 2026 opener, with Suhail Ahmad Bhat scoring a quick first-half brace—including his second goal in the 19th minute—to put India up 2-0.
https://t.co/MsrJUpXQFD— 🏏Cricket-Soccer⚽ Nostalgiation (@RiteshJ88156274) November 5, 2026
भारताचे आक्रमण इथेच थांबले नाही; ३२ व्या मिनिटाला नुफालने सुंदर ड्रिबलिंग करत किपगेनला चेंडू सोपवला. किपगेनने अप्रतिम शॉट मारत भारताचा तिसरा गोल नोंदवला आणि स्कोअर ३-० अशी एकतर्फी मजबूत आघाडी मिळवली. दरम्यान, पाकिस्तानला पुनरागमनासाठी सुवर्णसंधी म्हणून पेनल्टी मिळाली होती, मात्र शायक दोस्तने मारलेला फटका गोलपोस्टच्या वरून बाहेर गेल्याने ही नामी संधी वाया गेली. पहिल्या हाफअखेर भारताने सामन्यावर पूर्ण पकड ठेवली होती.
एक्स्ट्रा टाईममध्ये पाकिस्तानचा धसका; लागोपाठ २ गोल
FULL TIME! India 3-2 Pakistan!
A brace from Suhail Ahmad Bhat an a goal from Kipgen give India a narrow 3-2 win over Pakistan as Naushad Moosa’s side concedes two late goals!
#IndianFootball #IndianFootballTeam #INDvsPAK https://t.co/wNnegxs2Vj
— Khel Now (@KhelNow) November 5, 2026
दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी कायम ठेवत बदली खेळाडूंना संधी दिली. फारूक आणि केकल यांनी काही आक्रमक चाली रचल्या, मात्र गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सामना भारताच्या बाजूने सहज संपेल असे वाटत असतानाच इंज्युरी टाईममध्ये मोठा थरार पाहायला मिळाला. ९१ व्या मिनिटाला नजीबुल्लाहने हेडरद्वारे पाकिस्तानचा पहिला गोल केला, तर पाठोपाठ ९३ व्या मिनिटाला आलमगीर घाजीने शानदार व्हॉली शॉटवर दुसरा गोल करून गोलफलक ३-२ वर आणला.
अर्श शेखचा बचाव ठरला निर्णायक; भारताचा दिमाखदार विजय
Winning start for the defending champions in the #SAFFChampionship2026! 🇮🇳💙
#PAKIND #BlueTigers #IndianFootball https://t.co/APBipSFMxj
— Indian Football (@IndianFootball) November 5, 2026
पाकिस्तानने सलग दोन गोल डागल्याने सामन्यात एका क्षणी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र, भारतीय गोलकीपर अर्श शेखने अखेरच्या क्षणी अत्यंत सावध आणि चपळ बचाव करत पाकिस्तानचे बरोबरीचे स्वप्न धुळीस मिळवले. रेफ्रींनी अंतिम शिट्टी वाजवताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. ३-० ने पुढे असताना शेवटच्या तीन मिनिटांत झालेल्या या चढ-उतारामुळे सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.





