IND vs ENG : अखेरच्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी मारली बाजी! इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ने राखली बरोबरीत
IND vs ENG India beat England by 6 runs in the fifth Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना भारतीय संघाने ६ धावांनी जिंकत मालिका २-२ ने बरोबरीत राखली. या सामन्यात भारतीय संघाने ३७४ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३६७ धावांवर गारद झाला आणि भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयात मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेत मोलाची भूमिका बजावली.
ओव्हलवर शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारताला ४ विकेटची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाच्या पहिल्या षटकात क्रेग ओव्हरटनने २ चौकार मारून इंग्लंडसाठी दमदार सुरुवात केली, परंतु पुढच्याच षटकात सिराजने जेमी स्मिथला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवून सामना रोमांचक बनवला. त्यानंतर सिराजने पुढच्याच षटकात क्रेग ओव्हरटनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि टीम इंडियाला विजयाच्या अगदी जवळ आणले.
सिराजने अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड करत विजयावर केला शिक्कामोर्तब –
TAKE A BOW, MOHD. SIRAJ!
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/opZZ53Xnxh
— BCCI (@BCCI) August 4, 2025
यानंतर प्रसिद्ध कृष्णाची पाळी आली, ज्याने जोश टंगला क्लीन बोल्ड करून इंग्लंडची ९वी विकेट घेतली. यानंतर, एका हाताने फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गस अॅटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांनी मिळून इंग्लंडला लक्ष्याच्या जवळ आणले, परंतु शेवटी सिराजने अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड करून इंग्लंडला ३६७ धावांवर गुंडाळले आणि भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. यासह, कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. तसेच, सिराजने मालिकेत सर्वाधिक २३ विकेट घेतल्या.
हेही वाचा – IND vs ENG : जो रूटची ऐतिहासिक कामगिरी! भारताविरुद्ध तिसऱ्यांदा ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू
टीम इंडियाने लिहिला नवा अध्याय –
भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला आहे. परदेशी भूमीवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्याचा पराक्रम भारताने प्रथमच केला आहे. यापूर्वी भारताने परदेशात १६ वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या होत्या, त्यापैकी ६ वेळा शेवटच्या सामन्यात पराभव झाला होता, तर १० वेळा सामना अनिर्णीत राहिला होता. अखेर भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
सिराज-कृष्णाची भेदक गोलंदाजी –
पाचव्या दिवशी भारताच्या मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचे तीन गडी त्वरित बाद केले. दुखापतीनंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी उतरला, पण त्याला विशेष योगदान देता आले नाही. सिराजने दुसऱ्या डावात ५, तर कृष्णाने ४ गडी बाद केले. गस एटकिन्सन १७ धावा काढून शेवटचा गडी म्हणून बाद झाला. हा विजय भारताच्या कसोटी क्रिकेटमधील एक मैलाचा दगड ठरला आहे.





