“उत्तरप्रदेश निवडणुकीसाठीही इंडिया आघाडी कायम”; अखिलेश यांची स्पष्टोक्ती

प्रयागराज – उत्तरप्रदेशात पुढील विधानसभा निवडणूक २०२७ यावर्षी होईल. त्या निवडणुकीसाठीही इंडिया आघाडी कायम राहील, अशी स्पष्टोक्ती समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. त्यामुळे कॉंग्रेस समवेतची हातमिळवणी अबाधित ठेवण्याच्या सपच्या इच्छेवर शिक्कामोर्तब झाले.
मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. त्या निवडणुकीनंतर विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी ती आघाडी विखुरल्याचे दिसून आले.
त्या आघाडीची व्यवस्था केवळ राष्ट्रीय राजकारणासाठी असल्याची भूमिका काही पक्षांनी घेतली. त्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाली.
त्याविषयीचा प्रश्न अखिलेश यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर इंडिया आघाडी असित्वात आहे आणि राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाकुंभ मेळ्याच्या हाताळणीवरून अखिलेश यांनी सत्तारूढ भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
पुढील निवडणुकीनंतर आम्हाला सत्ता मिळाल्यास महाकुंभ मेळ्याशी संबंधित गैरव्यवस्थापनाची चौकशी केली जाईल. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची खरी आकडेवारी देण्यात आली नाही. महाकुंभ मेळ्यावेळी मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाविषयीही चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.





