Sanjay Jadhav : आघाडीमुळेच सेनेच्या ऱ्हासाची सुरुवात; खासदार संजय जाधव यांचा आरोप
.ठाकरेसेना पक्षाची मूळ हिंदुत्ववादी विचारधारा कमकुवत होणे, पक्षनेतृत्वाने बदल स्वीकारण्यास दिलेला नकार आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीअंतर्गत केलेली युती हीच शिवसेनेच्या ऱ्हासाची सुरुवात ठरली, असा आरोप जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला आहे.

Sanjay Jadhav : ठाकरेसेनेचे बंडखोर खासदार संजय जाधव यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत, ठाकरेसेना पक्षाची मूळ हिंदुत्ववादी विचारधारा कमकुवत होणे, पक्षनेतृत्वाने बदल स्वीकारण्यास दिलेला नकार आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीअंतर्गत केलेली युती हीच शिवसेनेच्या ऱ्हासाची सुरुवात ठरली, असा आरोप जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला आहे.
त्यांनी ठाकरेसेनेचे नेतृत्व आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यातील वाढती दरी, तसेच तळागाळात संघटना मजबूत करण्यात आलेले अपयश यांचाही उल्लेख केला. नांदेडहून परभणीला जात असताना एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले, ज्या तत्त्वांवर शिवसेनेची उभारणी झाली होती, त्यापासून ठाकरेसेना दूर गेली आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
हिंदुत्वाप्रती असलेली निष्ठा ओसरत चालली होती आणि पक्षाच्या मूळ विचारधारेपासून आम्ही भरकटलो आहोत, असे लोकांना वाटत होते. म्हणूनच मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीअंतर्गत केलेली युती हीच शिवसेनेच्या ऱ्हासाची सुरुवात ठरली. कार्यकर्ते आतून खचले होते. हिंदुत्वावर आधारित असलेला पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून दूर गेला.
आघाडीच्या प्रयोगामुळेच आमच्या अधोगतीला सुरुवात झाली. संघटना बळकट करण्याची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज होती, पण आम्ही कमकुवत झालो. पक्षात एकसूत्रता नव्हती. अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. ठाकरेसेनेच्या नेतृत्वाने कामकाजातील काही बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष केले.
राजकारण नेहमीच पैशावर चालत नाही. मला राजकारणात सक्रिय राहायचे होते, त्यामुळे मला काहीतरी भूमिका घेणे भाग होते. तसेच, माझ्या मनात ठाकरे कुटुंबाबद्दल कोणतीही कटुता नाही आणि भविष्यातही राहणार नाही. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत, त्यामुळे पक्ष आपलाच असावा असे त्यांना वाटते.
पण हेही खरे आहे की, २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांनी उचललेली काही पावले चुकली. जर त्यांनी वेळीच सुधारणावादी पावले उचलली असती, तर पक्षात फूट पडली नसती. पक्षातील कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले.






