Sharad Pawar: शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादीतही भूकंप? शरद पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला
Sharad Pawar: शिवसेना (उबाठा) पक्षातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण; पवारांनी स्पष्ट केली भूमिका.

Sharad Pawar – राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नसून आमचा एकही खासदार फुटणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट करीत खासदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांवर विश्वास व्यक्त केला. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी आमच्या पक्षात घडणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे गुरुवारी (दि.२५) बारामती दौऱ्यावर होते. गोविंदबाग निवास्थानातून पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार एकाच गाडीतून बाहेर पडले. त्यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना राजकीय घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नावर एका वाक्यात उत्तर देत राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडत सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे.
शिवसेनेनंतर पुढे कोणाचा नंबर, अशा चर्चा देखील महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही वेगळ्या विचारात असल्याची राजकीय चर्चेची राळ उडाली होती. मात्र, पवार यांनी आपल्या खासदारांवर विश्वास व्यक्त करीत राजकीय पटलावर उठलेल्या अफवांच्या वावटळीवर पडदा टाकला आहे. दरम्यान, दौऱ्यादरम्यान पवार यांची विविध कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये संस्थेची बैठक पार पडली.





