पुणे | मनीष आनंद यांची अपक्ष उमेदवारी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षातर्फे इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी सोमवारी (दि. २८) प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
एकच आनंद.. मनीष आनंदच्या घोषणांनी संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आनंद यांची ही बंडखोरी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मनीष आनंद यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुळा रोड येथील त्यांच्या कार्यालयापासून भव्य रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये आनंद यांचे शेकडो समर्थक सहभागी झाले होते. खडकी, बोपोडी, औंध रोड, मॉडेल कॉलनीमार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप घोले रोड येथे करण्यात आला. यानंतर मनीष आनंद यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी पत्रकारांशी बोलताना आनंद म्हणाले, या वेळी तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, काल (रविवारी) सायंकाळी कॉंग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमच्या सहकाऱ्याला उमेदवारी जाहीर केली.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी माघार नको, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ज्याप्रमाणे आम्ही ठरवले होते, त्या प्रमाणेच त्या- त्या भागानुसार प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत. त्याच कामांच्या आधारे जनतेला मी आशीर्वाद मागणार असून, माझा विजय निश्चित आहे.





