Indapur Panchayat Samiti – इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन मधुकर लोंढे तर उपसभापतीपदी जयकुमार गोपाळ कारंडे यांची सोमवारी (दि. ९) बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड कायम राहिली आहे. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेस जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच गटविकास अधिकारी सचिन खुडे उपस्थित होते. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीतील १६ सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले, पंचायत समिती गटनेते बापूराव शेंडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सागर मिसाळ, सचिन सपकळ यांच्यासह सदस्य श्रीराज भरणे, हेमा माडगे, जितेंद्र वनवे, कीर्ती काळे, दिलीप भिसे, कल्पना पाटील, अर्चना खबाले, रणजीत भोंग, अनिता सोनवणे, ज्योत्स्ना सुरूडकर, विमल काळे, धनश्री पाटील, शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावर पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. लासुर्णे-शेळगाव गणाला मान लासुर्णे-सणसर गटातील हर्षवर्धन लोंढे यांना सभापतीपदाचा मान मिळाला आहे. तर निमगाव केतकी-शेळगाव गटातील शेळगाव गणाचे सदस्य जयकुमार कारंडे यांची दुसऱ्यांदा उपसभापतीपदी निवड झाली आहे.