Indapur News : विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले! इंदापुरात आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी, तरुणाई मैदानात

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर शहराच्या राजकीय पटावर नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दहा प्रभागांतून 20 नगरसेवक निवडून येणार असून, या आरक्षण सोडतीनंतर पक्षांतर्गत समीकरणांमध्ये उलथापालथ होताना दिसत आहे.आरक्षण जाहीर होताच शहरातील विविध राजकीय गटांनी आपापल्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीची दिशा ठरवली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीद्वारे निवडणूक तयारीला गती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही गोट्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला वेग आलेला दिसत आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आपल्या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर इंदापूर या संकल्पनेवर आधारित विकासात्मक उपक्रम राबवले.
त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये शहा परिवाराबद्दल सकारात्मकता दिसत आहे. आरक्षण सोडतीनंतर शहा परिवाराच्या निवासस्थानी आणि त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याचे चित्र सध्या दिसते आहे. यंग ब्रिगेडच्या माध्यमातून शहा परिवारातील तरुण नेतृत्व आगामी निवडणुकीत रिंगणात उतरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कट..
आरक्षणाच्या फेरबदलाने यंदा अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. काही पुरुषांच्या जागी महिला आरक्षण पडल्याने गोट्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर नव्या पिढीतील उत्साही तरुण उमेदवारांनी नगरपरिषदेत प्रवेश करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नव्या नेतृत्वाच्या उदयाची चिन्हे दिसू लागली आहेत.





