Indapur News – महिला दिनानिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सक्षमीकरण आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित कार्यक्रमांना शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषदेने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला. सकाळी १० वाजता नगरपरिषद शेजारील शाळेत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती मयुरी उंबरे, उपसभापती सुनिता नलवडे, नगरसेविका वंदना शिंदे, सुनीता वाघ, अनिता ढावरे, शकिला बागवान, शीतल शेटे तसेच नगराध्यक्ष भरत शहा, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी, सागर अरगडे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक गणेश राऊत, प्रशांत उंबरे, वसीम बागवान आणि मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात नगरपरिषदेतील २८ महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ‘आपला दवाखाना’ सोनाई नगर, इंदापूर येथील वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता नगरपरिषदेच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन नगराध्यक्ष भरत शहा, गटनेते शकील सय्यद, महिला व बालकल्याण सभापती मयुरी उंबरे, उपसभापती सुनिता नलवडे, नगरसेविका दीप्ती राऊत, सुनीता वाघ, अनिता ढावरे, वंदना शिंदे, शीतल शेटे, शकिला बागवान, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. नगराध्यक्ष भरत शहा यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजवावी, असे सांगितले. रश्मी बारस्कर यांनी प्रास्ताविक व अल्ताफ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष ओहोळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, नगरपरिषदेसमोरील प्रांगणात दहा महिला बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये कुरडया, पापड, थालपीठ, धपाटे, वडापाव, पाणीपुरी तसेच महिलांनी तयार केलेल्या कपड्यांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. महिला बचत गट हे स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.